नवी दिल्ली : बंगळुरूमध्ये केवळ १० रुपयांची प्रिंटआऊटसाठीची छोटी ऑर्डर असो वा हैदराबादमधील एका ग्राहकाने आयफोन खरेदीसाठी उधळलेले ४.३ लाख रुपये… इन्स्टामार्टच्या २०२५ सालच्या वार्षिक ऑर्डर विश्लेषण अहवालातून प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांच्या खरेदीच्या सवयींबाबत अनेक रंजक बाबी समोर आल्या आहेत. या अहवालानुसार राजकोट आणि लुधियाना यांसारख्या टियर-२ शहरांमध्ये क्विक-कॉमर्स ऑर्डर्समध्ये अनेक पटींनी वाढ नोंदवली गेली आहे.
या अहवालानुसार, २०२५ मध्ये इन्स्टामार्टवरील सर्वाधिक खर्च करणाऱ्या ग्राहकाने तब्बल २२ लाख रुपयांची खरेदी केली. मुंबईतील एका ग्राहकाने प्लॅटफॉर्मवरून १५.१६ लाख रुपयांचे सोने खरेदी केले, तर चेन्नईतील एका वापरकर्त्याने एका वर्षात कंडोमवरच धक्कादायकपणे १ लाख रुपयांहून अधिक खर्च केला.
टियर-२ शहरांमध्ये २०२५ दरम्यान इन्स्टामार्टवरील ऑर्डर्समध्ये वर्षागणिक वाढ दिसून आली. राजकोटमध्ये ऑर्डर्समध्ये तब्बल १० पटींनी वाढ झाली, लुधियानामध्ये ७ पटींनी, तर भुवनेश्वरमध्ये ४ पटींनी वाढ नोंदवली गेली.
संपूर्ण भारतात कोथिंबीर (कढीपत्ता), दही, अंडी, दूध आणि केळी या वस्तूंनी पुनःपुन्हा दिल्या जाणाऱ्या ऑर्डर्समध्ये आघाडी घेतली. “कोची येथील एका चवप्रेमी ग्राहकाने वर्षभरात तब्बल ३६८ वेळा कढीपत्त्याची ऑर्डर दिली - म्हणजे जवळपास वर्षातील प्रत्येक दिवसासाठी एक,” असे इन्स्टामार्टची मालकी असलेल्या स्विगीने अहवालात नमूद केले आहे. तसेच, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील बहुतांश कार्ट सकाळी ७ ते ११ आणि पुन्हा दुपारी ४ ते संध्याकाळी ७ या वेळेत भरल्या जातात, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
बंगळुरूमधील एका स्थानिक ग्राहकाने वर्षभरात केवळ डिलिव्हरी पार्टनर्सना दिलेल्या टिप्सवरच ६८,६०० रुपये खर्च केल्याचे ‘हाऊ इंडिया इन्स्टामार्टेड २०२५’ या शीर्षकाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, स्विगीने यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा वाढून १,०९२ कोटी रुपये झाल्याचे जाहीर केले होते. क्विक-कॉमर्स विभागातील सातत्यपूर्ण तोटे आणि जाहिरात व विक्रीवरील खर्चात झालेली वाढ यामुळे हा तोटा वाढल्याचे कंपनीने सांगितले. याआधीच्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ तोटा ६२६ कोटी रुपये होता.
भारतीय बांधकाम क्षेत्रात २०२५ मध्ये विक्रमी संस्थात्मक गुंतवणूक
जेएलएलच्या मते, भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रात या कॅलेंडर वर्षात संस्थात्मक गुंतवणुकीत १७ टक्क्यांनी वाढ होऊन ती विक्रमी १०.४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदार चांगल्या परताव्यासाठी व्यावसायिक आणि गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पैसा गुंतवत आहेत. स्थावर मालमत्ता सल्लागार जेएलएल इंडियाने सोमवारी ही आकडेवारी प्रसिद्ध केली, ज्यानुसार २०२५ मध्ये भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रातील एकूण संस्थात्मक गुंतवणुकीपैकी ५२ टक्के वाटा देशांतर्गत गुंतवणूकदारांचा होता. उर्वरित ४८ टक्के गुंतवणूक परदेशी निधीतून आली आहे. आकडेवारीनुसार, भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रातील संस्थात्मक गुंतवणूक मागील कॅलेंडर वर्षातील ८,८७८ दशलक्ष डॉलरच्या तुलनेत १०,४०६ दशलक्ष डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. सल्लागार कंपनीने सांगितले की, विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये, कार्यालयीन विभागाने संस्थात्मक गुंतवणुकीत आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले आहे.