
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १८वा हंगाम किमान पुढील आठवडाभर स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. पुढील आठवडाभर देशभरातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाचा विचार करू, असे बीसीसीआयचे सचिव देवजीत साइकिया यांनी सांगितले.
२२ मार्चपासून आयपीएलचा १८वा हंगाम धडाक्यात सुरू झाला. गुरुवार, ८ मे रोजी पंजाब-दिल्ली यांच्यात धरमशाला येथे आयपीएलचा ५८वा सामना खेळवण्यात येत होता. मात्र पंजाब तसेच जम्मू-कश्मीर येथे पाकिस्तानने ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यांमुळे ही लढत मध्यातच स्थगित करण्यात आली. धरमशाला येथे संपूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आल्याने स्टेडियमचे प्रकाश पुरवणारे टॉवर अचानक बंद झाले. हळूहळू चारही टॉवर बंद झाल्यावर प्रेक्षकांना स्टेडियम सोडून जाण्यास सांगण्यात आले. बीसीसीआय तसेच मैदानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ही स्थिती योग्यपणे हाताळली. खेळाडू तसेच सामनाधिकारी, समालोचकांना सुरक्षित स्थळी नेण्यास बीसीसीआयने विशेष सुविधाही पुरवली.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताच्या २६ निष्पाप जणांचा बळी गेला. या हल्ल्याला भारताने ६ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे चोख प्रत्युत्तर दिले. या मोहिमेअंतर्गत भारताने ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यामुळेच पाकिस्तानने ८ मे रोजी पुन्हा प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने त्यांचे सर्व हल्ले उधळवून लावले. तसेच पाकिस्तानमधील काही शहरातही हल्ले केले. या सर्व युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात आयपील सुरू ठेवणे नैतिकदृष्या तसेच सुरक्षेच्या कारणास्तव चुकीचेच ठरत होते. परिणामी गुरुवारी फक्त सामना अर्ध्यात स्थगित केल्यानंतर शुक्रवारी संपूर्ण स्पर्धात किमान आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.
“देशातील सद्यस्थिती पाहता आयपीएलचा उर्वरित हंगाम एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. आयपीएलच्या प्रशासकीय समितीसोबत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. स्पर्धेच्या उर्वरित हंगामाच्या आयोजनाबाबत तसेच ठिकाणाविषयी पुढील काही दिवसांत स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. सर्व संघमालकांनी एकमताने यास होकार दर्शवला असून तूर्तास देशाच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य आहे,” असे बीसीसीआयचे सचिव साइकिया म्हणाले.
त्याशिवाय आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनीही या मताला दुजोरा दिला. “गुरुवारी सामना स्थगित झाल्यावरच आम्ही शुक्रवारी बैठक घेण्याचे ठरवले. सर्व भागधारक, प्रसारक व संघमालक यांच्याशी आम्ही आयपीएल स्थगित करण्याबाबत संवाद साधला. त्यांनीही देशात चिंतेचे वातावरण असताना स्पर्धा खेळवण्यास असमर्थन दर्शवले. त्यामुळे एकमताने पुढील काही दिवस आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे धुमाळ म्हणाले.
आयपीएलचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता. फक्त शेवटचे १६ सामने शिल्लक होते. यामध्ये १२ साखळी सामने, तर चार लढती बाद फेरीच्या आहेत. मात्र सध्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यात येतील, असे समजते. गुरुवारीच पंजाब-मुंबई यांच्यात धरमशाला येथे होणारा सामना अहमदाबाद येथे होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र तूर्तास संपूर्ण स्पर्धाच स्थगित झाली असून देशातील स्थिती लवकरच सुधारून पुन्हा एकदा आयपीएलचा हंगामा सुरू होईल, अशी चाहत्यांना आशा आहे.
पाकिस्तान सुपर लीगही स्थगित
पाकिस्तानमधील टी-२० स्पर्धा म्हणजेच पीएसएलही स्थगित करण्यात आली आहे. भारताने पाठवलेला एक ड्रोन रावळपिंडी स्टेडियमवर आदळल्याचे वृत्त गुरुवारी पसरले होते. त्या पार्श्वभूमीवर तेथील कराची-पेशावर यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. तसेच उर्वरित स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे खेळवण्यात येईल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सांगितले. मात्र शुक्रवारी यूएईने पाकिस्तानचा प्रस्ताव धुडकावून लावला. भारतावर सातत्याने दहशतवादी हल्ले केल्यामुळे युएईने त्यांच्या कृत्याचा निषेध केला आहे. त्यामुळे आता पीएसएल यूएईमध्येही होऊ शकत नाही.
ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिकेकडून पाठिंबा
ऑस्ट्रेलिया तसेच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळांनी बीसीसीआयशी संवाद साधून त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आपापल्या देशाच्या खेळाडूंना परत आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत पुरवण्यास आम्ही सज्ज आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या विदेशी खेळाडूंत मात्र भीतीचे सावट आहे. ऑस्ट्रेलियाने त्या लीगमध्ये खेळणाऱ्या आजी-माजी खेळाडूंना तातडीने परत बोलावले आहे.
रोहित, विराटसह दिग्गजांचा भारतीय सैन्याला सलाम
भारताचा कर्णधार रोहित शर्मा तसेच तारांकित फलंदाज विराट कोहली यांनी आयपीएल स्थगित करण्याच्या निर्णायाचे समर्थन केले आहे. तसेच भारतीय सैन्याच्या जिगरी वृत्तीला सलाम करतानाच संपूर्ण देशाला एकत्रित राहण्याचे आवाहन केले आहे. “प्रत्येक मिनिटाला घेण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयाद्वारे भारतीय सैन्याचा मला अधिक अभिमान वाटत आहे. भारतीय नौदल व वायुदलसुद्धा आपल्यासाठी झटत आहेत. कठीण काळात प्रत्येक भारतीयाला विनंती आहे की तुम्ही एकजुटीने रहा. अफवांवर विश्वास ठेवू नका. सुरक्षित रहा,” असे ट्वीट रोहितने केले. “आम्ही सर्व भारतीय सैन्यासह आहोत. आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर झटणाऱ्या सर्वांसाठी प्रार्थना करत रहा. तुम्हा सर्वांमुळे आम्ही सुरक्षित आहोत. जय हिंद,” असे विराटने इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये लिहिले. त्याशिवाय बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनीही देशहितासाठी सर्वांना एकत्रित येण्याचे आवाहन केले. तसेच सैन्याला पाठिंबा दर्शवला.
उर्वरित स्पर्धा कधी व कुठे खेळवू शकतो?
आयपीएल तूर्तास फक्त एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली असली तरी ती लवकर सुरू होईल का, हे सांगता येणार नाही. २० जूनपासून भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी आयपीएलचा १८वा हंगाम संपणे कठीण वाटते.
अशा स्थितीत ऑगस्टमध्ये १५ ते २० दिवसांच्या कालावधीत आयपीएलच्या उर्वरित १६ सामन्यांचे आयोजन करता येऊ शकते. ३१ जुलैपर्यंत भारताचा इंग्लंड दौरा संपेल. त्यानंतर १७ ऑगस्टपासून भारतीय संघ ३ एकदिवसीय व टी-२० सामन्यांच्या मालिकांसाठी बांगलादेशला जाणार आहे. मात्र बांगलादेशमधील स्थितीही गंभीर आहे. त्यामुळे हा दौरा रद्द करून त्या काळात आयपीएल खेळवली जाऊ शकते.
ऑगस्टमध्ये भारतात पावसाळा सुरू असतो. त्यामुळे भारताकडे संयुक्त अरब अमिरातीत स्पर्धा खेळवण्याचा प्रस्तावही आहे. इंग्लंडनेही भारताचे उर्वरित आयपीएल सामने खेळवण्यास तयारी दर्शवली आहे.
आशिया चषकही होणार रद्द?
सप्टेंबरमध्ये भारतात आशिया चषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. पुढील वर्षी टी-२० विश्वचषक होणार असल्याने त्या निमित्ताने ही स्पर्धा महत्त्वाची असते. मात्र या स्पर्धेत पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आशिया चषक रद्द करून सप्टेंबरमध्ये आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्याचा पर्याय बीसीसीआयपुढे आहे. आशिया चषक १९ दिवसांत आयोजित करण्यात येणार होता. त्याच कालावधीत आयपीएल होऊ शकते. मात्र यासाठी पुढील आठवडाभर देशातील स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे अपेक्षित आहे. यंदा महिलांचा एकदिवसीय विश्वचषकही भारतात होणार आहे.
आयपीएलमध्ये यंदा काय घडले?
मुंबई : आयपीएलचा १८वा हंगाम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा पुन्हा कधी सुरू होईल, याबाबत ठामपणे सांगता येणार नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात यंदा काय-काय घडले, कोणता संघ बाद फेरीच्या शर्यतीत टिकून आहे. कोणता संघ स्पर्धेबाहेर गेला, याचा आढावा घेणे गरजेचे आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये ७ मेपर्यंत ५७ सामने पूर्ण झाले होते. ५८व्या सामन्यात पंजाबने दिल्लीविरुद्ध १०.१ षटकांत १२२ धावा केल्या होत्या. त्याचवेळी सामना थांबवण्यात आला. आता जेव्हा स्पर्धा पुन्हा सुरू होईल. तेव्हा या लढतीद्वारेच स्पर्धेला प्रारंभ होईल. तसेच सामना ज्या अवस्थेत थांबवण्यात आला, तेथूनच सुरू करणे अपेक्षित आहे.
दरम्यान, गुणतालिकेत गुजरातचा संघ १६ गुणांसह अग्रस्थानी आहे. विराट कोहलीच्या बंगळुरूचेही १६ गुण आहेत. मात्र नेट रनरेटमध्ये गुजरात त्यांच्यापेक्षा पुढे आहे. पंजाब (१५ गुण), मुंबई (१४) हे संघही अव्वल चार संघांत आहेत. हैदराबाद, राजस्थान व चेन्नई हे संघ तळाच्या म्हणजेच अनुक्रमे आठव्या ते १०व्या स्थानी असून त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत (ऑरेंज कॅप) मुंबईचा सूर्यकुमार यादव, तर सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत (पर्पल कॅप) गुजरातचा प्रसिध कृष्णा आघाडीवर आहे.