इराणचे पाकिस्तानमध्ये हल्ले; बलुचिस्तानमधील जैश-अल-अद्ल गट लक्ष्य

काही दिवसांपूर्वी इराणमध्ये झालेल्या हल्ल्यांना जबाबदार असलेल्या जैश-अल-अद्ल या दहशतवादी गटाच्या तळांना या हल्ल्यात लक्ष्य केल्याचे इराणचे म्हणणे आहे.
इराणचे पाकिस्तानमध्ये हल्ले; बलुचिस्तानमधील जैश-अल-अद्ल गट लक्ष्य

तेहरान : इराणने बुधवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. काही दिवसांपूर्वी इराणमध्ये झालेल्या हल्ल्यांना जबाबदार असलेल्या जैश-अल-अद्ल या दहशतवादी गटाच्या तळांना या हल्ल्यात लक्ष्य केल्याचे इराणचे म्हणणे आहे.

पाकिस्तानने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून त्यात दोन लहान मुले मारली गेल्याचा दावा केला आहे. मंगळवारी इराणने सीरिया आणि इराकमधील लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. त्यानंतर लगेचच इराणने पाकिस्तानमध्ये हल्ले केल्याने हमास-इस्रायल युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील सब्झ कोह नावाच्या लहानशा गावात हल्ले केले आहेत. हे गाव इराणच्या-पाकिस्तान सीमेपासून ४५ किमी अंतरावर आणि पाकिस्तानमधील पंजगूर शहरापासून ९० किमी अंतरावर आहे. तेथे जैश-अल-अद्ल या दहशतवादी गटाचा तळ असल्याचा दावा इराणने केला आहे. या प्रदेशात लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.

इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील रस्क या गावातील पोलिस स्टेशनवर १५ डिसेंबर २०२३ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात इराणच्या सुरक्षादलांचे ११ कर्मचारी मारले गेले होते. हे ठिकाण पाकिस्तान सीमेपासून ६० किमी अंतरावर आहे. हल्लेखोर दहशतवादी जैश-अल-अद्ल या गटाचे होते आणि ते पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून आले होते, असा आरोप इराणने केला आहे. त्याचा बदला घेण्यासाठी बुधवारी इराणने पाकिस्तानमध्ये हल्ले केले आहेत. जैश-अल-अद्ल (द आर्मी ऑफ जस्टीस) हा सुन्नी इस्लामी सशस्त्र गट आहे. त्याला इराण आणि अमेरिकेनेही दहशतवादी घोषित केले आहे.

इराणने इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या सीरियातील इडलिब शहरातील तळांवर मंगळवारी हल्ले केले होते. तसेच इराकच्या स्वायत्त कुर्दिस्तान प्रांतातील अर्बिल या शहरात इस्रायलच्या मोसाद गुप्तहेर संघटनेच्या मुख्यालयावरही इराणने मंगळवारी क्षेपणास्त्रे डागली. इराणचे दिवंगत जनरल कासीम सुलेमानी यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात इसिसने स्फोट घडवले होते. त्यात सुमारे १०० इराणी नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच इस्रायलच्या मोसादने नुकतीच इराणच्या एका वरिष्ठ जलरलची हत्या केली होती. या घटनांचा बदला घेण्यासाठी इराणने मंगळवारचे हल्ले केल्याचा दावा केला होता. त्या पाठोपाठ पाकिस्तानमधील हल्ले झाले आहेत.

इराणच्या राजदूताची हकालपट्टी

इराणने बुधवारी पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानने इराणच्या राजदूताची देशातून हकालपट्टी केली असून इराणमधील आपल्या राजदूताला परत बोलावले आहे. इराणने केलेला हल्ला अवैध आणि अस्वीकारार्ह असून आम्ही प्रतिहल्ल्याचा अधिकार राखून ठेवतो, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in