Iran Israel War : आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य; परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन

रमजानच्या पवित्र महिन्यात इराण-इस्त्रायल युद्ध भडकणे दुर्दैवी असून आखातातील एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याची भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली आहे.
आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य; परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन
आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य; परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन
Published on

नवी दिल्ली : रमजानच्या पवित्र महिन्यात इराण-इस्त्रायल युद्ध भडकणे दुर्दैवी असून आखातातील एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याची भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली आहे.

इराण आणि आखाती भागातील संघर्ष तीव्र होत असताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात आखाती भागातील संघर्ष वाढणे हे दुर्दैवी असल्याचे भारताने स्पष्ट केले. या संघर्षात अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्याबद्दल भारताने तीव्र शोक व्यक्त केला. भारत सरकार बदलत्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून राष्ट्रीय हित लक्षात घेऊन आवश्यक निर्णय घेत राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीयांची सुरक्षा

आखाती भागात सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास असून तेथे ते काम करतात. त्यांच्या सुरक्षेला आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. या प्रदेशातील कोणत्याही नकारात्मक घडामोडींचा परिणाम भारतावर होऊ शकतो, अशी चिंता सरकारने व्यक्त केली. संघर्षग्रस्त देशांतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास नागरिकांशी सातत्याने संपर्कात असून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक सूचना जारी करत आहेत. अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितले.

व्यापार, ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम

भारताची व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात याच भौगोलिक क्षेत्रातून जाते. त्यामुळे कोणताही मोठा व्यत्यय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गंभीर परिणाम घडवू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. व्यावसायिक जहाजांवरील हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला आहे. गेल्या काही दिवसांत अशा हल्ल्यांमध्ये काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

उच्चस्तरीय चर्चा सुरू

पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या समकक्ष नेत्यांशी चर्चा केली असून भारत या क्षेत्रातील सरकारांशी आणि प्रमुख भागीदार देशांशी सतत संपर्कात आहे. बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून देशहितासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

ओमान, कुवेतच्या नेत्यांशी मोदींची दूरध्वनीवरून चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओमान आणि कुवेतमधील दोन प्रमुख नेत्यांशी फोनवरुन संवाद साधला आणि तेथील परिस्थितीची महिती घेतली. मोदींनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आणि कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर आणि येथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भातही चर्चा केल्याची प्राथमिक माहिती आहे.

भारत पुन्हा रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवणार

नवी दिल्ली : मध्य-पूर्वेत इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे तेलाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने भारताने पुन्हा एकदा रशियाकडे मोर्चा वळवला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवण्याचा विचार करत आहे. गेल्या काही दिवसांपासून होर्मूझमार्गे होणारा तेलाचा पुरवठा जवळपास थांबला आहे. त्यामुळे सरकारी रिफायनरीज आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत तातडीची बैठक घेऊन पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, भारत सध्या भारतीय समुद्राजवळ किंवा आशियाई जलक्षेत्रात असलेल्या रशियन तेल कार्गो खरेदी करण्याचा विचार करत आहे. आकडेवारीनुसार, सध्या सुमारे ९५ लाख बॅरल रशियन कच्चे तेल टँकरमध्ये भरून आशियाई देशांच्या आसपास वेटिंग मोडमध्ये आहे. पुरवठ्यात घट झाल्यास, भारत हे टँकर त्वरित स्वीकारू शकतो, ज्यामुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होईल.

logo
marathi.freepressjournal.in