

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) श्री रामेश्वरम ते तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा पर्यटकांच्या खिशाला परवडणारी असणार आहे.
भारत गौरव पर्यटक रेल्वेमार्फत एक विशेष धार्मिक पर्यटन दौरा श्री रामेश्वरम–तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'नवरत्न' सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) ने आयोजित केली आहे. १० दिवसांची ही विशेष यात्रा भारत गौरव पर्यटक रेल्वेद्वारे पार पडणार आहे. दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन या यात्रेमध्ये घडवले जाणार आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नाशिक येथून सुरू होऊन १६ नोव्हेंबर २०२५ रोजी समाप्त होईल.
नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी या स्थानकातून प्रवाशांना चढता आणि परतीच्या वेळेला उतरता येईल. तिरुपती बालाजी मंदिर दर्शनासाठी पर्यटकांना दर्शनाची तिकिटे स्वतंत्रपणे ऑनलाइन आरक्षित करावी लागतील, असे आयआरसीटीसीद्वारे सांगण्यात आले.