इस्रायलच्या दाेन ओलिसांची सुटका, राफातील कारवाईत ५० पॅलेस्टिनी ठार

इस्रायलच्या सेनादलांनी गाझा पट्टीतील राफा येथे केलेल्या कारवाईत २ ओलिसांची सुटका केली आहे. दरम्यान, राफा परिसरात इस्रायलच्या हल्ल्यात ५० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.
इस्रायलच्या दाेन ओलिसांची सुटका, राफातील कारवाईत ५० पॅलेस्टिनी ठार

जेरुसलेम : इस्रायलच्या सेनादलांनी गाझा पट्टीतील राफा येथे केलेल्या कारवाईत २ ओलिसांची सुटका केली आहे. दरम्यान, राफा परिसरात इस्रायलच्या हल्ल्यात ५० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून इस्रायलने गेल्या काही दिवसांत गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील राफा शहरावर हल्ले सुरू केले आहेत. या शहरात सुमारे १५ लाख पॅलेस्टिनी निर्वासितांनी आसरा घेतला आहे. त्यावर इस्रायलने तुफानी हवाई हल्ले केले आहेत. त्यात गेल्या २४ तासांत ५० नागरिक मारले गेल्याचे वृत्त आहे. हे हल्ले सुरू असतानाच राफा परिसरातील किबुत्झ नीर यित्झॅक या गावात इस्रायलची सेनादले, पोलीस आणि गुप्तहेर संघटनांनी संयुक्त कारवाई केली. त्यात फर्नांडो सिमॉन मॉरमॉन (वय ६०) आणि लुईस हार (वय ७०) या दोन ओलिसांची सुटका करण्यात आली. हे दोघे इस्रायली-अर्जेंटिनियन वंशाचे आहेत. त्यांना हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या हल्ल्यावेळी पळवून नेऊन ओलीस ठेवले होते. नीर यित्झॅक गावातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे दोघे आढळून आले, अशी माहिती इस्रायलच्या सेनादलांचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी दिली. इस्रायलच्या सेनादलांनी त्यांची सुटका केल्यानंतर त्यांना शेबा मेडिकल सेंटरमध्ये नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या केंद्राचे हंगामी संचालक अरमॉन आयेक यांनी सांगितले की, त्या दोघांचीही प्रकृती चांगली आहे.

logo
marathi.freepressjournal.in