गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांची पॅलेस्टाईन समर्थनार्थ रॅली, पोलिसांनी हाणून पाडला प्रयत्न

पोलिसांनी रोखल्यानंतरही एका चहा कॅफे हॉटेलात जाऊन त्यांनी आपल्यापरीने पोलिसांचा विरोध जुगारून इस्रायल विरोधात निदर्शने केली.
गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांची पॅलेस्टाईन समर्थनार्थ रॅली, पोलिसांनी हाणून पाडला प्रयत्न

प्रतिनिधी गोवन वार्ता

म्हापसा : पॅलेस्टाईन समर्थक देशी-विदेशी नागरिकांनी आज (शनिवार) सकाळी म्हापसा येथील बाजापेठेत रॅली काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखल्यानंतरही एका चहा कॅफे हॉटेलात जाऊन त्यांनी आपल्यापरीने पोलिसांचा विरोध जुगारून इस्रायल विरोधात निदर्शने केली. यात सुमारे ३०-३५ पॅलेस्टाईन समर्थकांचा समावेश होता.

गेल्या तीन महिन्यापासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धात दोन्ही बाजूकडील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर गोव्यात म्हापसा येथे शनिवारी सकाळी काही विदेशी पर्यटकांनी पॅलेस्टाईन समर्थनार्थ रॅली काढण्याचा प्रयत्न केला.

म्हापसा पोलिसांनी बाजारपेठेच्या प्रवेश द्वारावर तत्काळ ही रॅली रोखली आणि जमलेल्या देशी व विदेशी समर्थकांना माघारी पाठवण्याचा प्रयत्न केला. इस्रायल-हमास युद्धात मृत्यू पावलेल्यांच्या समर्थनार्थ रॅली काढत असल्याचे त्यांनी सांगितले. पण पोलिसांनी या रॅलीस विरोध करून त्यांना अडवले. शिवाय रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांकडील ध्वज आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

म्हापसा मार्केटमध्ये आज सकाळी १०.३० च्या सुमारास हे देशी-विदेशी पर्यटक जमले. या लोकांनी पॅलेस्टाईन समर्थनार्थ रॅली काढण्याचा प्रयत्न केला. यात महिला वर्गाचा जास्त प्रामुख्याने समावेश होता. चहा कॅफेमध्ये या पॅलेस्टाईन समर्थकांनी आश्रय घेतल्यानंतर त्यांनी तिथे पेंटिंग आणि आपल्या चेहऱ्यावर पॅलेस्टाईन ध्वज रेखाटला. यावेळी मामलेदार भिकू गावस, पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक सीताकांत नायक, विजय राणे व इतर अधिकारी पोलीस फौजफाट्यासह हजर होते. हे पॅलेस्टाईन नागरिक दुपारी १२.३० च्या सुमारास बाजारपेठेतून निघन गेले.

logo
marathi.freepressjournal.in