इस्रायलचा सीरियामध्ये हवाई हल्ला; इराणच्या संरक्षण दलाचे चार नेते ठार

इस्रायलच्या हवाई दलाने शनिवारी पहाटे सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोअरचे (आयआरजीसी) चार वरिष्ठ नेते मारले गेले.
इस्रायलचा सीरियामध्ये हवाई हल्ला; इराणच्या संरक्षण दलाचे चार नेते ठार
Published on

दमास्कस : इस्रायलच्या हवाई दलाने शनिवारी पहाटे सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोअरचे (आयआरजीसी) चार वरिष्ठ नेते मारले गेले. हमास-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने इराणच्या अनेक लष्करी सेनानींना परदेशांत लक्ष्य बनवले आहे.

दमास्कसच्या माझ्झे नावाच्या भागातील एका चार मजली इमारतीत इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोअरचे चार वरिष्ठ नेते बैठकीसाठी एकत्र जमले होते. ते इस्रायलविरोधात काही गुप्त खलबते करत असल्याची माहिती इस्रायलच्या गुप्तहेर पथकांना मिळाली होती. त्या माहितीनुसार इस्रायलच्या हवाई दलाने शनिवारी पहाटे या इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यात इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डचे चार नेते मारले गेले. ही इमारत दमास्कसच्या ज्या भागात आहे तेथेच अनेक देशांच्या वकिलाती, संयुक्त राष्ट्रांचे कार्यालय आदी महत्त्वाची आस्थापने आहेत. अशा वर्दळीच्या आणि उच्च पदाधिकाऱ्यांचा वार असलेल्या ठिकाणी इस्रायलच्या हवाई दलाने अचूक हल्ला करून इराणच्या नेत्यांना टिपले आहे. इराणने या हल्ल्यात त्यांचे सीरियातील चार 'लष्करी सल्लागार' मारले गेल्याचे मान्य केले आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हल्ल्यात किमान चार क्षेपणास्त्रे डागल्याचे इराणने म्हटले आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजन चॅनेलने दिलेल्या वृत्तात हा इस्रायलचा दहशतवादी हल्ला असल्याचा उल्लेख केला आहे. सीरियाच्या सना वृत्तवाहिनीनेही यासंबंधी वृत्त दिले आहे.

'ॲक्सिस ऑफ द रेझिस्टन्स'विरोधी कारवाई

गाझा पट्टीतील हमास, लेबॅननमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुथी बंडखोरांबरोबरच सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांनाही इराणचा पाठिंबा आहे. हे सर्व देश आणि गट इस्रायलच्या विरोधात आहेत. या सर्वांना इस्रायल 'ॲक्सिस ऑफ द रेझिस्टन्स' नावाने ओळखते. त्यांच्याविरुद्ध इस्रायलने विशेष कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत गेल्या काही दिवसांत इस्रायलने अनेक नेत्यांना ठार मारले आहे. इस्रायलने २५ डिसेंबर २०२३ रोजी सीरियातील सय्यदा झैनाब येथे केलेल्या हल्ल्यात इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड‌्सच्या कुद्स फोर्सचे जनरल राझी मुसावी यांना ठार मारले होते. अमेरिकेने ३ जानेवारी २०२० रोजी बगदादमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डचे जनरल कासीम सुलेमानी मारले गेले होते.

logo
marathi.freepressjournal.in