बंगळुरू : ‘चांद्रयान-३’ मिशनच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ आता बहुप्रतीक्षित ‘सीएमएस-०३’ सॅटेलाइट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. येत्या रविवारी २ नोव्हेंबरला हा सॅटेलाइट लॉन्च होणार आहे. ‘इस्त्रो’ ४,४०० किलोचा सर्वाधिक वजनदार ‘सीएमएस-०३’ उपग्रह सर्वांत शक्तिशाली रॉकेट ‘एलव्हीएम-३’च्या सहाय्याने लॉन्च करणार आहे. ‘सीएमएस-०३’ हा नौदलासाठी खास विकसित केलेला उपग्रह आहे.
आंध्र प्रदेशातील श्री हरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च केल्यानंतर हा सॅटेलाइट कम्युनिकेशनच्या भविष्याला नवी दिशा देणार आहे. यामुळे भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातील शक्ती वाढेल. देशातील कोट्यावधी नागरिकांच्या आयुष्यात डिजिटल क्रांती येईल.
नौदलासाठी वरदान
सीएमएस-०३ हे नौदलासाठी एक वरदान ठरणार आहे. हा उपग्रह नौदल ऑपरेशन्स, हवाई संरक्षण आणि स्ट्रॅटेजिक कमांड कंट्रोलसाठी उपयुक्त ठरेल. सागरी देखरेख, टेहळणी, नेव्हिगेशन आणि हवामान देखरेख यासारख्या वैशिष्ट्यांमुळे देशाच्या सागरी सुरक्षेला बळ मिळेल. तज्ज्ञांच्या मते, या उपग्रहामुळे दुर्गम भागात डिजिटल जाळे वाढवेल. यामुळे नागरी संस्थांनाही फायदा होईल.
