
अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल ९ महिने आणि १४ दिवसांनी सुखरुपपणे पृथ्वीवर परतल्यामुळे जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमेरिकेपासून गुजरातमधील सुनीता विल्यम्स यांचे मूळ गाव झूलासनपर्यंत सर्वत्र आनंदाची लाट पसरली आहे.
"एक उल्लेखनीय कामगिरी"
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO- Indian Space Research Organization) नेही नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम यांचे सुरक्षित पुनरागमन "एक उल्लेखनीय कामगिरी" असल्याचे म्हटले. इस्त्रोने सुनीता विल्यम्स यांच्या परतण्याचे स्वागत केले आणि "आम्हाला अंतराळ संशोधनातील तुमच्या कौशल्याचा वापर करायचा आहे," अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ISRO ने नेमकं काय म्हटलं?
'वेलकम बॅक, सुनीता विल्यम्स' अशी सोशल मीडिया पोस्ट इस्रोने आपल्या 'एक्स'वरील अधिकृत अकाउंटवर केली. तसेच, "तुमची दृढता आणि समर्पण जगभरातील अंतराळ प्रेमींना प्रेरणा देत राहील. अंतराळ विभागाचे सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष म्हणून (डॉ. व्ही. नारायणन), माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभ दिवसाच्या शुभेच्छा देतो. माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला एक विकसित देश बनवण्याच्या दिशेने काम करत असताना, आम्ही अंतराळ संशोधनातील तुमच्या कौशल्याचा लाभ घेऊ इच्छितो" असे म्हटले आहे.
सुनीता विल्यम्स तब्बल ९ महिने आणि १४ दिवसांनी सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या आहेत. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे १७ तासांच्या प्रवासानंतर त्या पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्या. त्यांच्यासोबत अन्य तीन अंतराळवीर देखील होते. ५ जून २०२४ रोजी सुनीता विल्यम्स यांनी बुच विल्मोर यांच्यासह अंतराळ स्थानकाकडे उड्डाण केलं होतं. त्यांची ही मोहिम केवळ आठवडाभराची होती. मात्र, त्यांच्या स्टारलायनर या अंतराळयानातून हेलियम गॅसची गळती आणि थ्रस्टर्समध्ये निर्माण झालेल्या अडचणी यामुळे त्यांना तब्बल ९ महिने अंतराळ स्थानकावर थांबावे लागले.