

श्रीहरिकोटा : भारतातून प्रक्षेपित करण्यात आलेला सर्वात जड दळणवळण उपग्रह ‘बाहुबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या पिढीच्या स्वदेशी रॉकेटच्या सहाय्याने रविवारी यशस्वीपणे कक्षेत सोडण्यात आला, अशी माहिती ‘इस्रो’ने दिली.
४,४१० किलो वजनाचा दळणवळण उपग्रह ‘सीएमएस-०३’ हा ‘एलव्हीएम३-एम५’ रॉकेटद्वारे अवकाशात पाठवण्यात आला. या यशामुळे इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ‘सीएमएस-०३’ हा मल्टी-बँड दळणवळण उपग्रह असून तो भारतीय भूभागासह विस्तीर्ण समुद्री क्षेत्रावर सेवा पुरवेल, असे इस्रोने सांगितले.
हा उपग्रह ‘जीटीओ’ या कक्षेत अचूकपणे स्थापित करण्यात आला असून, तो २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘जीसॅट-७’ मालिकेच्या उपग्रहाचा पर्याय आहे.
‘मिशन कंट्रोल सेंटर’मधून राष्ट्राला उद्देशून भाषण करताना ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले की, प्रक्षेपण यानाने उपग्रहाला अपेक्षित कक्षेत अचूकपणे पोहोचवले आहे. ४,४१० किलोचा उपग्रह अचूकपणे कक्षेत सोडण्यात आला असून ‘एलव्हीएम३’ रॉकेट म्हणजे ‘बाहुबली’ आहे. या रॉकेटद्वारे यापूर्वी ‘चांद्रयान-३’ची मोहीम यशस्वी करण्यात आली होती, ज्याचा देशाला अभिमान आहे. आज आणखी एक अभिमानाचा क्षण आपण अनुभवत आहोत, असे ते म्हणाले.
‘एलव्हीएम३’ रॉकेटची सर्व आठ उड्डाणे यशस्वी ठरली आहेत, म्हणजेच या रॉकेटचा यशाचा दर १०० टक्के आहे. हा उपग्रह किमान १५ वर्षे सेवा पुरविणार असून तो ‘आत्मनिर्भर भारताचे आणखी एक उज्ज्वल उदाहरण’ आहे, असे नारायणन म्हणाले. हवामान अनुकूल नसतानाही वैज्ञानिकांनी अत्यंत परिश्रमपूर्वक ही मोहीम यशस्वी केली, असेही ‘इस्त्रो’चे प्रमुख नारायणन यांनी सांगितले.
‘इस्रो’ने जड उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी फ्रेंच गयाना येथील कौरू प्रक्षेपण केंद्राचा आणि फ्रान्सस्थित एरियानस्पेसच्या एरियन रॉकेट्सचा वापर केला होता.
‘एलव्हीएम३-एम५’ हे तीन टप्प्यांचे प्रक्षेपण यान असून यात दोन घनइंधन रॉकेट बूस्टर्स (एस २००), द्रवरूप इंधनाचे मध्य टप्पे (एल ११०) आणि क्रायोजेनिक टप्पा (सी-२५) यांचा समावेश आहे. या रॉकेटमुळे ‘इस्रो’ला ४ हजार किलो वजनाच्या उपग्रहांना ‘जीटीओ’मध्ये स्वतःच्या बळावर प्रक्षेपित करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.
‘पीएसएलव्ही’ हे ‘इस्रो’चे सर्वाधिक विश्वासार्ह आणि यशस्वी प्रक्षेपण यान मानले जाते. ज्याद्वारे सुमारे १,७५० किलो वजनाचे पेलोड वाहून नेता येतात.
५०० किलोपर्यंतचे उपग्रह कमी उंचीवरील पृथ्वी कक्षेत पाठवण्यासाठी ‘इस्रो’ ‘एलएसएलव्ही’ रॉकेट वापरते. ‘जीएसएलव्ही’ हे रॉकेट २,२०० किलो वजनाचे जड उपग्रह वाहून नेऊ शकते, तर ‘एलव्हीएम३’ रॉकेटची क्षमता ४ हजार किलोपेक्षा जास्त पेलोड वाहून नेण्याइतकी वाढवण्यात आली आहे.
रविवारीची मोहीम विशेष ठरली कारण ‘एलव्हीएम३’ रॉकेटने प्रथमच भारतातून जड दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले, असे ‘इस्रो’ने सांगितले. हे रॉकेट पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आले असून त्यात ‘सी-२५’ क्रायोजेनिक टप्पा समाविष्ट आहे. ‘गगनयान मिशन’साठी मानवी उड्डाण क्षमतेसाठी ‘एलव्हीएम३’ या यानाचा वापर केला जाणार आहे.