२०४० पर्यंत भारतीय उतरणार चंद्रावर; ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांची माहिती

भारताची अंतराळ संस्था ‘इस्रो’ २०४० पर्यंत भारतीयांना चंद्रावर उतरवण्याचे ध्येय ठेवून आहे आणि २०२७ मध्ये ‘गगनयान’ ही पहिली मानवी अंतराळ मोहीम पाठवण्याचीही तयारी सुरू असल्याची माहिती ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली.
२०४० पर्यंत भारतीय उतरणार चंद्रावर; ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांची माहिती
Published on

रांची : भारताची अंतराळ संस्था ‘इस्रो’ २०४० पर्यंत भारतीयांना चंद्रावर उतरवण्याचे ध्येय ठेवून आहे आणि २०२७ मध्ये ‘गगनयान’ ही पहिली मानवी अंतराळ मोहीम पाठवण्याचीही तयारी सुरू असल्याची माहिती ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली.

या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये २०३५ पर्यंत राष्ट्रीय अंतराळ स्थानक उभारणे आणि २०२६ पर्यंत तीन मानवविरहित ‘गगनयान’ मोहिमा पूर्ण करणे यांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले. रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा येथे ३५ व्या पदवीदान समारंभात नारायणन बोलत होते.

डिसेंबर २०२५ पर्यंत ‘व्योममित्र’ नावाचा अर्ध-मानव रोबोट तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४० पर्यंत स्वदेशी मानवी चंद्रमोहिमेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मोहिमेद्वारे भारतीयांना चंद्रावर उतरवून सुरक्षित परत आणले जाईल. तसेच, शुक्राचा अभ्यास करण्यासाठी ‘शुक्र परिभ्रमण मिशन’लाही मंजुरी मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय अंतराळ स्टेशन २०३५ पर्यंत स्थापन होण्याची अपेक्षा आहे, ज्याचे पहिले मॉड्युल २०२७ पर्यंत तयार होईल. मोदी यांनी अंतराळ क्षेत्रासाठी स्पष्ट आराखडा आणि सुधारणा केल्यामुळे ‘इस्रो’ एका स्वावलंबी आणि चैतन्यशील अंतराळ परिसंस्थेचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे, असेही ते म्हणाले.

‘व्योममित्र’ नावाचा अर्ध-मानव रोबोट

अर्ध-मानव रोबोट तयार करणार ‘गगनयान’ ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम २०२७ मध्ये प्रक्षेपित केली जाईल. यापूर्वी, २०२६ पर्यंत तीन मानवविरहित ‘गगनयान’ मोहिमा पूर्ण करण्याचे ‘इस्रो’चे नियोजन आहे. या मानवविरहित मोहिमांमध्ये अंतराळात जाण्याची आणि परत येण्याची चाचणी घेतली जाईल. डिसेंबर २०२५ पर्यंत ‘व्योममित्र’ नावाचा एक अर्ध-मानव रोबोट तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

भारताचे आगामी प्रकल्प

चांद्रयान-४, चांद्रयान-५, नवी मंगळ मोहीम, एएक्सओएम, उच्च प्राधान्य असलेले खगोलशास्त्रीय वेधशाळा मोहीम आदी भारताचे आगामी प्रकल्प आहेत.

logo
marathi.freepressjournal.in