लवकरच जग ‘नासा’पेक्षा ‘इस्रो’बाबत बोलेल! अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचे प्रतिपादन

भारत अंतराळ संशोधनात जलद प्रगती करत असल्याने नासा नव्हे तर इस्रोबद्दल जग बोलेल, तो दिवस लांब नाही, असे प्रतिपादन भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर सुधांशु शुक्ला यांनी सोमवारी केले.
लवकरच जग ‘नासा’पेक्षा ‘इस्रो’बाबत बोलेल! अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचे प्रतिपादन
Photo : ANI
Published on

लखनऊ : भारत अंतराळ संशोधनात जलद प्रगती करत असल्याने नासा नव्हे तर इस्रोबद्दल जग बोलेल, तो दिवस लांब नाही, असे प्रतिपादन भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर सुधांशु शुक्ला यांनी सोमवारी केले.

ते म्हणाले की, भारतात परतल्यानंतर मला लोकांमध्ये अंतराळ यशांबद्दल जबरदस्त उत्साह जाणवला. राष्ट्रीय अंतराळ दिन दोन वर्षांपासून साजरा होत आहे, तरीही त्याभोवतीची ऊर्जा अफाट होती.

"उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितल्याप्रमाणे, लवकरच जग नासापेक्षा इस्रोबद्दल बोलेल. मला वाटते हे स्वप्न नसून वास्तव आहे, जे लवकरच घडणार आहे," असे शुक्ला यांनी लखनौ येथे झालेल्या सत्कार समारंभात सांगितले. सत्कारानंतर शुक्ला भावुक झाले आणि हसत म्हणाले, "आज सकाळी साधारण ७:३० वाजता लखनौमध्ये उतरलो आणि तेव्हापासून आतापर्यंत मी सुमारे २ हजार सेल्फी काढल्या असतील. 'मुस्कुराइए, आप लखनौ में हैं' ही प्रसिद्ध म्हण आज खरी वाटली."

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य व ब्रजेश पाठक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि शुक्ला यांचे कुटुंबीय, पत्नी कामना, आई आशा आणि वडील शंभू शुक्ला उपस्थित होते. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन उपस्थित होते.

लखनौमध्ये आलेला उत्साह "दुप्पट" असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. "घरी परतल्यावर लोकांनी दिलेला हा मनापासूनचा सन्मान माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. लोकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि अभिमानाबद्दल मी खूप आभारी आहे," असे त्यांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात शुक्ला यांनी १८ दिवस संशोधन केले. त्यानंतर सॅन दिएगो जवळ प्रशांत महासागरात लँडिंग करण्यात आले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पथकाने ६० प्रयोग केले.

"भारतीय वैज्ञानिकांनी डिझाइन केलेले प्रयोग करणे हा सर्वात अभिमानाचा क्षण होता. पहिल्यांदाच त्यांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात संशोधनाची संधी मिळाली. या संशोधनातून मिळालेला डेटा ही खरी उपलब्धी नाही तर या मोहिमेमुळे भविष्यातील भारतीय संशोधनासाठी उघडलेले दरवाजे आहेत," असे त्यांनी सांगितले.

अंतराळात जाण्याचा विश्वास मुलांमध्ये निर्माण

"प्रत्येकवेळी मुलांनी विचारले की, ते कसे अंतराळवीर होऊ शकतात. या मोहिमेची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे तरुण पिढी आता फक्त अंतराळात जाण्याची आकांक्षा करत नाही, तर त्यांना विश्वास वाटतो की ते हे करू शकतात," असे शुक्ला म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in