इस्रोचा एक्स्पोसॅट झेपावला; कृष्णविवरांचे अध्ययन करणारी विशेष मोहीम

पोलिक्स हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड आहे. हे रमण संशोधन संस्था आणि यूआर राव सॅटेलाइट सेंटर यांनी संयुक्तपणे तयार केले आहे.
इस्रोचा एक्स्पोसॅट झेपावला; कृष्णविवरांचे अध्ययन करणारी विशेष मोहीम
Published on

श्रीहरिकोटा : सोमवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) मोठा इतिहास रचला आहे. इस्रोने नव्या वर्षातली पहिली अंतराळ मोहीम सुरू केली असून आपल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. इस्रोने १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी 'क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह' (एक्स्पोसॅट) मिशनचं प्रक्षेपण केलं. २०२३ मध्ये चांद्रयान-३ मिशनद्वारे चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-१ मिशनद्वारे सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर, इस्रोनं यावर्षी अंतराळ क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे.

इस्रोच्या माहितीनुसार, नव्या वर्षातील पहिली मोहीम आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आली. मिशनच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे. एक्स्पोसॅट ही संशोधनासाठी एक प्रकारची वेधशाळा आहे, जी अवकाशातील कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांबद्दल अधिक माहिती गोळा करेल. एक्स्पोसॅट उपग्रह वर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला. हा उपग्रह अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करेल. त्यांच्या स्रोतांचे फोटो घेर्इल. त्यात बसवलेली दुर्बीण रमण संशोधन संस्थेनं बनवली आहे. हा उपग्रह विश्वातील ५० तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे. जसे- पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हा. हा उपग्रह ६५० किमी उंचीवर पाठवण्यात येणार आहे. २०१७ साली इस्रोनेही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेचा खर्च ९.५० कोटी रुपये आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे २२ मिनिटे, एक्स्पोसॅट उपग्रह त्याच्या नियुक्त कक्षेत तैनात केला जाईल. या उपग्रहामध्ये दोन पेलोड्स आहेत. पहिला- पोलिक्स आणि दुसरा- एक्स्पेक्ट.

पोलिक्स

पोलिक्स हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड आहे. हे रमण संशोधन संस्था आणि यूआर राव सॅटेलाइट सेंटर यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. १२६ किलो वजनाचे हे उपकरण अवकाशातील स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र, रेडिएशन, इलेक्ट्रॉन इत्यादींचा अभ्यास करेल. हे ८-३० केर्इव्ही श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. पोलिक्स अवकाशातील ५० पैकी ४० तेजस्वी वस्तूंचा अभ्यास करेल.

एक्स्पेक्ट

एक्स्पेक्ट म्हणजे, एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी आणि वेळ. ते ०.८ - १५ केर्इव्ही श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. म्हणजेच, ते पोलिक्सच्या श्रेणीपेक्षा कमी ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. हे पल्सर, ब्लॅक होल बायनरी, कमी-चुंबकीय क्षेत्राचे न्यूट्रॉन तारे, मॅग्नेटार इत्यादींचा अभ्यास करेल.

logo
marathi.freepressjournal.in