अमेरिका अवैध स्थलांतरित भारतीयांचा मुद्दा; शीखांना पगडी न घालू दिल्याने संताप आणि निषेध

शनिवारी परत पाठवण्यात आलेल्या अवैध स्थलांतरित भारतीयांमध्ये शीख प्रवासी हे विमानतळावर पगडीशिवाय दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) निषेध व्यक्त केला आहे.
अमेरिका अवैध स्थलांतरित भारतीयांचा मुद्दा; शीखांना पगडी न घालू दिल्याने संताप आणि निषेध
अमेरिका अवैध स्थलांतरित भारतीयांचा मुद्दा; शीखांना पगडी न घालू दिल्याने संताप आणि निषेधscreenshot
Published on

अमेरिकेने अवैध मार्गाने स्थलांतर करून बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना परत पाठवले आहे. रिपोर्टनुसार, आतापर्यंत तीन तुकड्यांमध्ये एकूण 332 जणांना पाठवण्यात आले आहे. यापैकी शनिवारी (दि १५) परत पाठवण्यात आलेल्या नागरिकांमध्ये शीखांचा मोठा समूह होता. यावेळी परत पाठवण्यात आलेले शीख प्रवासी हे अमृतसर विमानतळावर पगडीशिवाय दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) निषेध व्यक्त केला आहे. तर शिरोमणी अकाली दलचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांनी यावर कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

अवैध मार्गाने स्थलांतर करून अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणखी ११६ भारतीयांना परत घेऊन अमेरिकेचे सी-१७ ग्लोबमास्टर III लष्करी वाहतूक विमान शनिवारी अमृतसर येथील विमानतळावर उतरले. यावेळी विमानतळावर स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्ण होत असताना तिथे थांबलेल्या शीखा प्रवाशांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शीख पगडीशिवाय दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शीखांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शीखांची धार्मिक संस्था शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) कडक शब्दांत याचा निषेध केला आहे.

यापैकी एका प्रवाशाने दावा केला आहे की, भारतात परत पाठवणाऱ्या विमानात बसण्याआधी आम्हाला पगडी घालू दिली नाही. आम्हाला तिथे पगडी काढायला लावली.

एसजीपीसीने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या शीखांना अशा प्रकारे त्यांच्या पगड्या घालू न देण्याच्या कथित कृतीचा तीव्र निषेध केला. याविषयी एसजीपीसीचे सरचिटणीस गुरुचरण सिंह ग्रेवाल म्हणाले, " पगडी हा शीख धर्माचा एक भाग आहे. शीखांना अशाप्रकारे पगड्या न घालू देणे आणि साखळदंडात बांधून पाठवणे हे खेदजनक आहे. एसजीपीसी लवकरच हा मुद्दा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडे उपस्थित करेल." असे ते म्हणाले.

शिरोमणी अकाली दलचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांनीही शीखांना त्यांच्या पगड्यांशिवाय पाठवल्याबद्दल अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला या प्रकरणी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडे तातडीने दखल घेण्याची विनंती केली आणि ते म्हणाले की, भविष्यात अशा घटना पुन्हा घडायला नकोत.

याशिवाय आणखी एका प्रवाशाने त्यांना साखळदंडात बांधल्याचा दावा केला आहे. अमृतसर विमानतळावर बेकायदेशीर भारतीय स्थलांतरासाठी लंगर आणि बस सेवा पुरवणाऱ्या एसजीपीसीच्या अधिकाऱ्यांनी परतलेल्या शीख बांधवांना पगड्या पुरवल्या.

logo
marathi.freepressjournal.in