शहरी नक्षलवाद्यांचा मुखवटा फाडणे गरजेचे; गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

देशांतर्गत आणि बाह्य शक्ती अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून जगासमोर भारताची नकारात्मक प्रतिमा रंगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शहरी नक्षलवाद्यांना ओळखून त्यांनी धारण केलेला मुखवटा फाडून टाकण्याची गरज आहे...
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लष्कर, नौदल, सीमा सुरक्षा दल आणि हवाई दलाच्या जवानांसमवेत दिवाळी साजरी केली.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लष्कर, नौदल, सीमा सुरक्षा दल आणि हवाई दलाच्या जवानांसमवेत दिवाळी साजरी केली.
Published on

एकतानगर : देशांतर्गत आणि बाह्य शक्ती अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून जगासमोर भारताची नकारात्मक प्रतिमा रंगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शहरी नक्षलवाद्यांना ओळखून त्यांनी धारण केलेला मुखवटा फाडून टाकण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले.

गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर घेतलेल्या एका जाहीरसभेत पंतप्रधान बोलत होते. देशात २०१४ पासून ३१ ऑक्टोबर हा सरदार पटेल यांचा जयंतीदिन 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून पाळण्यात येतो.

गुंतवणूकदारांना चुकीचा संदेश

भारताचे वाढते सामर्थ्य आणि क्षमता यामुळे देशांतर्गत आणि बाह्य शक्ती देशात अस्थिरता माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या शक्ती देशाच्या आर्थिक हितांना बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. जगासमोर देशाची नकारात्मक प्रतिमा रंगवून परदेशी गुंतवणूकदारांना चुकीचा संदेश पाठवण्याचे त्यांचे मनसुबे आहेत, असे मोदी म्हणाले. इतकेच नव्हे, तर या शक्ती अपप्रचार करून देशाच्या सशस्त्र दलांना लक्ष्य करीत आहेत आणि लष्करामध्ये फुटीरतावादाची बिजे पेरण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही मोदी यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता यावेळी केला. या शक्ती देशात जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, देशवासीयांच्या ऐक्याला आणि भारतीय समाजाला दुबळे करणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे. या शक्तींना विकसित भारत देश पाहण्याची इच्छा नाही, कारण दुर्बल आणि गरीब भारताचे राजकारणच त्यांना रुचते. गेल्या जवळपास पाच दशकांपासून अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण सुरू आहे, असेही मोदी म्हणाले.

जंगलातील नक्षलवाद अखेरच्या घटका मोजतोय

याच शक्ती लोकशाही आणि घटनेबद्दल भाष्य करतात, मात्र ते प्रत्यक्षात देशात फूट पाडण्याचे काम करतात. शहरी नक्षलवाद्यांचे लागेबांधे ओळखून त्यांनी धारण केलेला मुखवटा फाडून टाकणे गरजेचे आहे. जंगलातील नक्षलवाद आता अखेरच्या घटका मोजत असताना नवा नक्षलवाद डोके वर काढत आहे, असेही ते म्हणाले.

मोदींनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लष्कर, नौदल, सीमा सुरक्षा दल आणि हवाई दलाच्या जवानांसमवेत दिवाळी साजरी करून आपली परंपरा कायम राखली. मोदी सीर खाडी परिसरातील लक्की नाला येथे पोहोचले, तेथे त्यांनी जवानांना मिठाई देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी यावेळी सीमा सुरक्षा दलाचा गणवेश परिधान केला होता. गस्ती जहाजावरील जवानांना ते मिठाईचे वाटप करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in