राजदशी दोनदा आघाडी केली ती चूक होती - नितीशकुमार

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि नितीशकुमार शुक्रवारी एका कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हा नितीशकुमार यांनी वरील निर्धार व्यक्त केला.
राजदशी दोनदा आघाडी केली ती चूक होती - नितीशकुमार
FPJ
Published on

पाटणा : कट्टर प्रतिस्पर्धी लालूप्रसाद यादव नेते असलेल्या राजदशी एकदा नव्हे तर दोनदा आघाडी करून आपण चूक केली. भविष्यात त्याची पुनरावृत्ती करावयाची नाही, असा निर्धार बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते नितीशकुमार यांनी शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीतच व्यक्त केला.

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि नितीशकुमार शुक्रवारी एका कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हा नितीशकुमार यांनी वरील निर्धार व्यक्त केला. बिहारमध्ये जी चांगली कामे झाली ती आमच्या नेतृत्वाखालीच झाली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपल्यापूर्वी जे सत्तेवर होते त्यांनी काहीच केले नाही. त्यांच्यासमवेत आपण दोनदा आघाडी केली ती चूक होती. त्याची पुनरावृत्ती करणार नाही. आपण एनडीएसोबतच राहू, असेही नितीशकुमार यांनी राजदचा नामोल्लेख टाळून सांगितले. सदैव भाजपसमवेतच राहणार असल्याचे नितीशकुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच स्पष्ट केले होते.

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी भाजपसमवेत एकनिष्ठ राहणार असल्याचा दावा केल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. मात्र विरोधी पक्षनेता या नात्याने आपल्याला बैठकीला हजर राहणे आवश्यक होते, असे स्पष्टीकरण तेजस्वी यादव यांनी दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in