चीनवर विश्वास ठेवायला वेळ लागेल; लडाख कराराबाबत लष्करप्रमुख द्विवेदी यांचा सावध पवित्रा

भारत-चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर गस्तीबाबत झालेल्या कराराबाबत लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदीपीटीआय
Published on

नवी दिल्ली : भारत-चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर गस्तीबाबत झालेल्या कराराबाबत लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सावध पवित्रा घेतला आहे. ‘हा करार उत्तम असून दोन्ही देशांनी एकमेकांबद्दल विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. भूतकाळातील घटना पाहता आम्हाला चीनवर विश्वास ठेवायला वेळ लागेल, असे द्विवेदी यांनी सांगितले.

लष्करप्रमुख म्हणाले की, दोन्ही देशांचे सैन्य मागे हटणे व बफर झोनचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. एकमेकांवर विश्वास कसा निर्माण होईल? जेव्हा आम्ही एकमेकांचे ऐकू व एकमेकांना संतुष्ट करू शकू. बफर झोनची निर्मिती करणे आवश्यक आहे, असा विश्वास दोन्ही देशांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. गस्तीमुळे ही प्रक्रिया अतिशय सोपी होईल. विश्वासनिर्मितीसाठी दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांशी संवाद साधून चर्चा करणे आवश्यक आहे. यातून गस्तीसाठी योग्य ती परिस्थिती निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

भारतासमवेतच्या कराराला चीनचाही दुजोरा

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते, हा तिढा संपुष्टात आणणारा करार दोन्ही देशांमध्ये झाल्याचे मंगळवारी चीननेही मान्य केले.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जिआन यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी स्तरावर चर्चा सुरू होती. मात्र, आता दोन्ही देशांमध्ये संबंधित प्रश्नांवर करार झाला आहे.

या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी चीन भारतासमवेत काम करील, असेही ते म्हणाले. मात्र, या कराराचा सविस्तर तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. रशियातील कझान येथे ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे का, असे विचारले असता प्रवक्त्याने सांगितले की, त्याबाबत माहिती मिळाल्यास ती दिली जाईल. दरम्यान, पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर गस्त घालण्याबाबत चीनशी करार झाल्याचे सोमवारी भारताने जाहीर केले होते.

logo
marathi.freepressjournal.in