निवडणूक सुधारणांचे समर्थक जगदीप छोक्कर यांचे निधन

भारतातील निवडणूक प्रक्रिया स्वच्छ होण्यासाठी आयुष्यभर धडपडणारे ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’चे (एडीआर) सहसंस्थापक जगदीप छोक्कर यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
निवडणूक सुधारणांचे समर्थक जगदीप छोक्कर यांचे निधन
Photo : X
Published on

नवी दिल्ली : भारतातील निवडणूक प्रक्रिया स्वच्छ होण्यासाठी आयुष्यभर धडपडणारे ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’चे (एडीआर) सहसंस्थापक जगदीप छोक्कर यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. छोक्कर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-अहमदाबादचे सेवानिवृत्त प्राध्यापक होते. १९९९ मध्ये सहकाऱ्यांसह त्यांनी ‘एडीआर’ची स्थापना केली होती आणि राजकारणातील पारदर्शकता वाढवण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व केले होते.

‘एडीआर’ने निवेदनात म्हटले आहे की, छोक्कर यांनी आपले शरीर ‘लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज’ला दान केले. एक आदरणीय शैक्षणिक तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, वकील, अभियंता आणि संवर्धनकर्ते म्हणून प्रा. छोक्कर यांनी भारतीय सार्वजनिक जीवनात लोकशाही प्रशासन बळकट करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी दिलेले योगदान वैशिष्ट्यपूर्ण होते. जे त्यांना ओळखत होते, त्यांच्यासाठी ते केवळ स्वच्छ राजकारणाचे प्रवर्तक नव्हते, तर उदार मार्गदर्शक, सूक्ष्म विचारवंत आणि आपुलकीचे मित्र होते. छोक्कर यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने ‘निवडणुका आणि जबाबदारी’ याविषयी विचार करण्याची पद्धत बदलली. त्यांचा आदर्श मजबूत आणि सशक्त लोकशाहीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देत राहील.”

गेल्या तीन दशकांत ‘एडीआर’च्या प्रयत्नांमुळे निवडणुकांवर परिणाम करणारे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. त्यात २००२ मधील ऐतिहासिक निर्णयाचाही समावेश आहे, ज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांनी आपले गुन्हेगारी प्रकरणे, आर्थिक माहिती आणि शैक्षणिक पार्श्वभूमी जाहीर करणे अनिवार्य करण्यात आले.

फेब्रुवारी २०२४ मध्ये, ‘एडीआर’ याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने सरकारची निवडणूक रोखे ही योजना असंवैधानिक ठरवली. तसेच अन्य एका याचिकेवर झालेल्या आणखी एका निर्णयामुळे निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची तपासणी व पडताळणी करण्यासाठी पराभूत उमेदवारांच्या विनंतीवर नवीन प्रणाली लागू करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in