
जयपूर : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सेवानिवृत्ती वेतनासाठी राजस्थान विधानसभेत अर्ज दाखल केला आहे. ते १९९३ ते १९९८ पर्यंत किशनगड मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी विधानसभा सचिवालयात पेन्शनसाठी अर्ज केला होता, ज्यावर मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियम आणि तरतुदींनुसार त्यांना किमान ४२ हजार रुपये पेन्शन मिळेल. याशिवाय, माजी आमदारांना मिळणाऱ्या इतर सुविधाही मिळणार आहेत.
प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होण्यापूर्वी १९८९ ते १९९१ पर्यंत राजस्थानच्या झुंझुनू मतदारसंघाचे लोकसभा खासदारही होते. चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये त्यांना केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी मिळाली होती. धनखड २०१९ ते २०२२ पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. अनेकदा राजभवन आणि ममता बॅनर्जी सरकार संघर्षाच्या बातम्या येत होत्या. यानंतर, केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने धनखड यांना उपराष्ट्रपती केले ते २०२२-२५ पर्यंत या पदावर होते.
२१ जुलैला राजीनामा
जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण सांगत २१ जुलैला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. या राजकीय घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. राजीनाम्यानंतर, ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात अथवा इतर कोणत्याही कार्यक्रमात दिसले नाही. तसेच त्यांची काही प्रतिक्रियाही आली नाही. त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
धनखड सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. त्यांच्या सहाय्यकाने दिलेल्या माहितीनुसार, माजी उपराष्ट्रपतींचा दिवस योगाने सुरू होतो. ते सायंकाळच्या वेळी निवासस्थानाशेजारील मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये टेबल टेनिसही खेळतात.