
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी मंजूर केला. धनखड यांनी सोमवारी प्रकृतीचे कारणास्तव राष्ट्रपतींना पत्र पाठवून राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. धनखड यांनी आपला राजीनामा तत्काळ मंजूर करावा, अशी विनंती राष्ट्रपतींना केली होती. या राजीनाम्याबाबत राज्यसभेला गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे कळवण्यात आले. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘धनखड यांना उत्तम आरोग्य लाभो’, अशी ‘एक्स’वर पोस्ट केली. धनखड यांना भारताचे उपराष्ट्रपती म्हणून अनेक भूमिका पार पाडत देशाची सेवा करण्याची संधी मिळाली, असे मोदी म्हणाले. धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
राज्यसभेचे कामकाज हरिवंश चालवणार
उपराष्ट्रपतींनी पद सोडल्याने राज्यसभेचे सभापतीपद रिक्त झाले आहे. राज्यसभेत पीठासीन अधिकारी घनश्याम तिवारी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचे पूर्ण कामकाज जदयूचे खासदार हरिवंश हे चालवणार आहेत. राष्ट्रपतींकडून अधिकृत सदस्याला ही जबाबदारी मिळू शकते. हरिवंश यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता धनखड यांच्या जागी राज्यसभेचे कामकाज सुरू केले. धनखड हे राज्यसभेच्या कामकाजात सहभागी झाले नाहीत.
लवकर निवडणूक घ्यावी लागेल
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लवकरात लवकर करावी लागेल. कारण राज्यघटनेनुसार, मृत्यू, राजीनामा किंवा पदावरून हटवल्यानंतर उपराष्ट्रपतीपद तत्काळ भरण्याची तरतूद आहे.
लोकशाहीसाठी काळा दिवस
उपराष्ट्रपती धनखड यांच्या अचानक राजीनाम्याने देशात राजकारण तापले आहे. हा दिवस ‘लोकशाहीसाठी काळा दिवस’ आहे, अशी टीका विरोधकांनी केली. प्रत्येकजण या राजीनाम्यामागील कारण जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे. राजकीय मतभेद किंवा हा मोठा कट असावा, असे काही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत सक्रिय दिसणाऱ्या धनखड यांनी अचानक रात्री राजीनामा का दिला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
राजीनामा नाही, सरकारच्या हुकूमशाहीचे प्रतीक - राहुल
हा केवळ राजीनामा नाही, तर सरकारच्या हुकूमशाहीचे प्रतीक आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. धनखड यांचा अचानक राजीनामा हा अनेक रहस्य उघड करतो. धनखड यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला का? याबाबत सरकारने तत्काळ स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
सपाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, धनखड यांचा राजीनामा हा गंभीर संकेत आहे. संवैधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींवर सरकार दबाव टाकत आहे का? हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असे ते म्हणाले. तर, सरकारतर्फे संवैधानिक संस्था कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.