उडुपी : उडुपी जिल्ह्यातील करकाला तालुक्यात असलेल्या ईदू गावात नक्षलविरोधी पथकाने (एएनएफ) केलेल्या कारवाईत जहाल नक्षलवादी विक्रम गौडा ठार झाल्याचे मंगळवारी सूत्रांनी सांगितले.
विक्रम गौडा याचा नक्षलविरोधी पथक जवळपास २० वर्षांपासून शोध घेत होते, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले. गौडा हा जहाल नक्षलवादी होता आणि तो सातत्याने पोलिसांच्या तावडीतून सुटत होता, असेही गृहमंत्री म्हणाले.
नक्षलविरोधी पथक सोमवारी शोध घेत असताना त्यांना नक्षलवाद्यांचा एक गट दिसला. पथकाला पाहताच या गटाने गोळीबार सुरू केला. त्याला पथकाने प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये गौडा ठार झाला. जवळपास दोन दशकांपासून विक्रम गौडा नक्षलवादी कारवाया करीत होता. त्याने केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही काळ आश्रय घेतला होता.