जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण आग; ६ जणांचा मृत्यू

जयपूरच्या सरकारी सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयाच्या न्यूरो आयसीयूमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सहा रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण आग; ६ जणांचा मृत्यू
Published on

जयपूर : जयपूरच्या सरकारी सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयाच्या न्यूरो आयसीयूमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सहा रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. ट्रॉमा सेंटरचे प्रभारी डॉ. अनुराग ढाकड यांनी सांगितले की, आग लागली तेव्हा आयसीयूत ११ रुग्णांवर उपचार सुरू होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय आहे. आग वेगाने पसरल्यामुळे केवळ पाच रुग्णांना वाचवता आले. मृत सहा जणांत दोन महिला आणि चार पुरुषांचा मृत्यू झाला असून पाच जणांवर उपचार सुरू आहेत, असे ढाकड यांनी सांगितले. अन्य १४ रुग्णांना दुसऱ्या आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून ते सुरक्षित आहेत, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “जयपूरमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेला जीवितहानीचा प्रसंग अतिशय दु:खद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकर बरे व्हावे,” असे एक्सवर लिहिले. राजस्थानातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या एसएमएस हॉस्पिटलमध्ये संपूर्ण राज्यातून तसेच इतर भागांतूनही रुग्ण उपचारासाठी येतात.

या दुर्घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी आंदोलन केले आणि अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, संसदीय कार्यमंत्री जोगाराम पटेल आणि गृहराज्य मंत्री जवाहरसिंह बेधम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीचे नेतृत्व वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त इक्बाल खान करतील. समिती आगीचे कारण, रुग्णालयाची आपत्कालीन तयारी, सुरक्षा व्यवस्था आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपाय आदींचा अभ्यास ही समिती करेल.

logo
marathi.freepressjournal.in