

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद व तिच्या सदस्य देशांवर थेट टीका केली. काही सदस्य देश दहशतवादी संघटनांना संरक्षण देतात, ज्यामुळे या आंतरराष्ट्रीय संस्थेची विश्वसनीयता धोक्यात येत आहे, असा आरोप जयशंकर यांनी यावेळी केला.
आपल्याला हे मान्य करावे लागेल की, संयुक्त राष्ट्रात सर्व काही आलबेल नाही. त्याच्या निर्णयप्रक्रियेत सर्व सदस्य देशांचे योग्य प्रतिनिधित्व होत नाही आणि आजच्या जगातील प्रमुख गरजांकडे लक्षही दिले जात नाही. संयुक्त राष्ट्रातील चर्चा अतिशय विभागलेल्या स्वरूपात होत आहेत. संस्थेचे कामकाजही ठप्प झालेले दिसत आहे. संस्थेची दहशतवादावरील भूमिका विश्वसनीयतेतील कमतरता उघड करते, असा टोला जयशंकर यांनी लगावला.
या उल्लेखनीय वर्धापनदिना निमित्त आपल्याला निराश होऊन चालणार नाही, बहुपक्षीयतेप्रती आपली बांधिलकी कितीही त्रुटीपूर्ण असली, तरी ती ठाम राहिली पाहिजे. संयुक्त राष्ट्राला पाठबळ द्यायला हवे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावरचा आपला विश्वास नवा करायला हवा. आजच्या काळातही आपण अनेक मोठ्या संघर्षांचे साक्षीदार आहोत. हे केवळ मानवी जीवावर परिणाम करत नाहीत, तर आंतरराष्ट्रीय समुदायालाही अस्थिर करतात. विशेषतः ‘ग्लोबल साउथ’ म्हणजेच विकसनशील राष्ट्रांनी या संघर्षांची पीडा खोलवर अनुभवली आहे. संयुक्त राष्ट्रात सुधारणा करणे ही आजच्या काळातली सर्वात मोठी आव्हाने आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जयशंकर यांनी दहशतवादाविषयी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. जेव्हा सुरक्षा परिषदेचा एखादा विद्यमान सदस्य पहलगामसारख्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या दहशतवादी संघटनांचे खुलेआम समर्थन करतो, तेव्हा बहुपक्षीय संस्थांची विश्वासार्हता कितपत उरते, जर जागतिक रणनीतीच्या नावाखाली दहशतवादाच्या पीडितांनाच समान दोषी ठरवले जात असेल, तर जग किती स्वार्थी होऊ शकते, हे यातून दिसून येते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.