

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची २० ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. रुबिओ यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ही चर्चा होईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना द्विसाप्ताहिक पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्रमंत्री जयशंकर हे मुंबईच्या नियोजित दौऱ्यात रुबिओ यांची भेट घेणार आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर जयस्वाल म्हणाले, ‘१९ आणि २० ऑक्टोबर २०२६ रोजी परराष्ट्रमंत्री मुंबईत संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांचे अधिकृत दौऱ्यासाठी स्वागत करतील. २० ऑक्टोबर रोजी परराष्ट्रमंत्री अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा करतील. तसेच अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.’
जयशंकर आणि रुबिओ यांच्यातील या बैठकीत भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या उपायांवर चर्चा केली जाईल, असे जयस्वाल यांनी सांगितले. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मंगळवारी सांगितले होते. रुबिओ प्रथम उझबेकिस्तानमधील समरकंदला भेट देतील. त्यानंतर १७ ते २२ ऑक्टोबरदरम्यान ते मुंबई आणि जामनगरला भेट देणार असल्याचेही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले होते.