
ब्रुसेल्स : यापुढे पाकिस्तानने जर भारताला चिथावणी दिली तर भारत पाकिस्तानच्या कोणत्याही भागात घुसून हल्ला करण्यास सज्ज आहे, असा इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ब्रुसेल्स भेटीदरम्यान ‘पॉलिटिको’शी बोलताना दिला. पाकिस्तान हा एक असा देश आहे, जो दहशतवादाचा वापर देशाचे धोरण म्हणून करतो आणि हाच कळीचा मुद्दा आहे, असेही जयशंकर म्हणाले.
‘पॉलिटिको’शी बोलताना डॉक्टर जयशंकर म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताच्या लढाऊ विमानांनी आणि क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. त्यामुळे पाकिस्तान गुडघे टेकत शस्त्रसंधीसाठी तयार झाला. राफेल असो की इतर क्षेपणास्त्रे हे किती प्रभावी होते, त्याचा पुरावा पाकिस्तानचे नष्ट झालेले हवाईतळ आहेत.
कोठेही कारवाई करू!
एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा देताना म्हटले की, पाकिस्तान उघडपणे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. त्यानंतर त्या दहशतवाद्यांना भारतात पाठवत आहे. आता हे आम्ही सहन करणार नाही. आमचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघटना आणि दशतवाद्यांना मदत करण्याचे सुरूच ठेवले, तर पाकिस्तानच्या कोणत्या भागात ते दहशतवादी आहेत, त्याचा विचार आम्ही करणार नाही. ते जेथे असतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही कारवाई करणार आहोत.