श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) यांच्यात आघाडी झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुक अब्दुल्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ९० जागांसाठी काँग्रेस आणि एनसी यांच्यात आघाडी झाल्याचे गुरुवारी एनसीचे नेते डॉ. अब्दुल्ला यांनी सांगितले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आमची चर्चा झाली. आघाडी योग्य मार्गावर आहे, देवाची इच्छा असल्यास ती सुरळीतपणे पार पडेल, आघाडीचा अंतिम निर्णय झाला आहे, त्यावर सायंकाळी स्वाक्षरी केली जाईल. ९० जागांसाठी आघाडी केली जाणार आहे, असे डॉ. अब्दुल्ला यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरला घटक राज्याचा दर्जा देण्याबाबत वक्तव्य केले, त्याबाबत विचारले असता डॉ. अब्दुल्ला म्हणाले की, राज्याचा दर्जा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्हाला त्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. राज्याने कठीण काळ सोसला आहे. त्यामुळे पूर्ण अधिकारांसह राज्याचा दर्जा मिळेल आणि त्यासाठी आम्ही इंडिया आघाडीसमवेत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम असेल का, असे विचारले असता डॉ. अब्दुल्ला यांनी तो प्रश्नच नसल्याचे सांगितले. देशातील फुटीर शक्तींचा पराभव करणे हाच एकमेव किमान समान कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्याशी निवडणुकीपूर्वी अथवा नंतर आघाडी होऊ शकते. कोणासाठीही दरवाजे बंद नाहीत, असेही त्यांनी सांगितले.पानावर