श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या २६ जागांसाठी बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून, एकूण २३९ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेचे हे २६ मतदारसंघ सहा जिल्ह्यांत पसरले असून त्यापैकी तीन मतदारसंघ खोऱ्यात आहेत.
मतदारांनी मोकळेपणे मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाने ३,५०२ मतदान केंद्रांची व्यवस्था केली असून त्यापैकी १,०५६ केंद्रे शहरी भागात, तर २,४४६ केंद्रे ग्रामीण भागांत आहेत. पारदर्शकतेसाठी निवडणूक आयोग सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा उपलब्ध करून देणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी दुसऱ्या टप्प्यात १५७ विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी २६ गुलाबी मतदान केंद्रे असून तेथे महिला कर्मचारी आहेत. अन्य २६ मतदान केंद्रांवर युवक तैनात करण्यात आले आहेत, तर ३१ मतदान केंद्रे सीमेवर आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.
बुधवारी होणाऱ्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, जम्मू-काश्मीर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कार्रा आणि भाजपचे राज्यप्रमुख रविंदर रैना यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. पहिल्या टप्प्यात सरासरी ६१.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तिसऱ्या टप्प्याचे मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार असून ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.