Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

ऑगस्ट २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.
Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात
एएनआय
Published on

श्रीनगर/जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पीर पंजाल पर्वतराजीच्या दोन्ही बाजूला असलेले सात जिल्हे पहिल्यांदाच विधानसभेत मतदान करणार आहेत. बुधवारी केंद्रशासित प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी १० वर्षानंतरची पहिली निवडणूक होत आहे.

२३ लाखांहून अधिक मतदार २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यामध्ये ९० अपक्ष आहेत. ते २४ विधानसभा जागांसाठी निवडणूक लढवत आहेत. जम्मू विभागातील तीन जिल्ह्यांत आठ आणि काश्मीर खोऱ्यातील चार जिल्ह्यांत १६ ठिकाणी मतदान होणार आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. निवडणूक आयोगानुसार, एकूण २३ लाख २७ हजार ५८० मतदार पहिल्या टप्प्यात मतदान करण्यास पात्र आहेत. यामध्ये ११ लाख ७६ हजार ४६२ पुरुष, ११ लाख ५१ हजार ५८ महिला आणि ६० तृतीय-लिंग मतदार आहेत. १८ ते १९ वर्षे वयोगटातील १.२३ लाख तरुण, २८,३०९ अपंग व्यक्ती आणि ८५ वर्षांवरील १५,७७४ वृद्ध मतदारदेखील पहिल्या टप्प्यात मताधिकार वापरण्यास पात्र आहेत.

१४ हजार मतदान कर्मचारी

एकूण १४ हजार मतदान कर्मचारी ३,२७६ मतदान केंद्रांवर प्रक्रियेवर देखरेख करतील. या ठिकाणी ३०२ शहरी मतदान केंद्रे आणि २,९७४ ग्रामीण मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पीठासीन अधिकाऱ्यासह चार निवडणूक कर्मचारी तैनात असतील.

पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असल्याने जम्मू-काश्मीर पोलिसांनी विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना मतदानाचा हक्क बजावता येईल, असे काश्मीर परिमंडळाचे पोलीस महानिरीक्षक व्ही. के. बिर्डी यांनी सांगितले. राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in