जम्मू/श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी शांततेत पार पडले. राज्यात २४ मतदारसंघासाठी झालेल्या पहिल्या टप्प्यात दिवसअखेर ५९ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत किश्तवाडमध्ये सर्वाधिक ७०.३० टक्के तर पुलवामामध्ये सर्वात कमी ३६.९० टक्के मतदानाची नोंद झाली होती.
पहिल्या टप्प्याकरिता सात जिल्ह्यांत सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले. दुपारी १२ पर्यंत २५ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर टक्केवारीचे प्रमाण वाढत गेले. मतदानादरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी बिजबेहरा व पोरा परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद वगळता दिवसभरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पहिल्या टप्प्यासाठी होत असलेल्या २४ जागांपैकी १६ विधानसभा मतदारसंघ हे काश्मीर खोऱ्यात तर ८ मतदारसंघ हे जम्मू भागात आहेत. केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेल्या जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. निवडणुकीचा दुसरा व तिसरा टप्पा अनुक्रमे २५ सप्टेंबर व ५ ऑक्टोबरला होणार आहे. तर मतमोजणी ५ऑक्टोबरला होणार आहे.
प्रदेश भाजप उपाध्यक्षासह दोन बंडखोर नेते निलंबित
जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवल्याबद्दल भाजपच्या तीन वरिष्ठ नेत्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. पक्षाच्या सुनील सेठी यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीच्या शिफारशीवरून प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष पवन खजुरिया यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते बलवान सिंग आणि नरिंदर सिंग यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. खजुरिया उधमपूर पूर्व विधानसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून लढत आहेत. तिथे भाजपने माजी आमदार आर. एस. पठानिया यांना उमेदवारी दिली आहे.
एक दशकानंतर प्रथमच विधानसभेसाठी मतदान
राज्य विधानसभेसाठी गेल्या दहा वर्षात प्रथमच मतदान होत आहे. तर कलम ३७० हटविल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक लक्षणीय ठरत आहे. राज्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानाने देशात सर्वाधिक मतदानाची नोंद केली होती. जम्मू आणि काश्मीरला ऑगस्ट २०१९ मध्ये पहिल्यांदा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला.