जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी; ३ जणांचा मृत्यू : १०० जणांना वाचवण्यात यश : २५० पेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी; ३ जणांचा मृत्यू : १०० जणांना वाचवण्यात यश : २५० पेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी सकाळी रामबन जिल्ह्यातील सेरी बागना परिसरात झालेल्या ढगफुटी होऊन ३ जणांचा मृत्यू झाला.
Published on

श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी सकाळी रामबन जिल्ह्यातील सेरी बागना परिसरात झालेल्या ढगफुटी होऊन ३ जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने जवळपास १०० जणांना वाचवले असून ढगफुटी व अचानक आलेल्या पुरामुळे सरकारी शाळा, घरे व रस्ते, वाहने वाहून गेले. डोंगरावरून वाहून आलेला दगडमातीचा ढिगारा गावांकडे आला आणि अनेक घरांना धडकला. यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

रामबन जिल्ह्यातील बनिहाल परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये ३० घरे कोसळली. धर्मकुंड येथे आलेल्या पुरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता आहे. चिनाब नदीजवळील धर्मकुंड गावात भूस्खलन झाल्याने १० घरे पूर्णपणे दगडमातींच्या वेढ्यात सापडली आहेत, अन्य २५-३० घरांचेही नुकसान झाले. धर्मकुंड पोलिसांनी सुमारे ९०-१०० लोकांना सुरक्षितपणे वाचवले.

सेरीबागना गावात घर कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. दहा घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. रात्री एकच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली. धरमकुंडात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून ४५ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे रामबन शहर, बनिहाल, खारी, बटोटे, धरमकुंड आणि सेरी बागनामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांसाठी शाळांमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री आणि उधमपूरचे भाजप खासदार डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, “रामबन आणि आसपासच्या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, गारपीट, जोरदार वारे आणि भूस्खलन झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग सध्या बंद आहे आणि प्रशासन मदत कार्यात गुंतले आहे. आम्ही उपायुक्त बसीर-उल-हक चौधरी यांच्याशी सतत संपर्कात आहोत आणि बचाव कार्यासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे आणि गरज पडल्यास ते वैयक्तिक संसाधनांसह देखील मदत करतील.”

दोन दिवसांत जम्मूमध्ये पाच जणांचा मृत्यू

गेल्या दोन दिवसांत जम्मू भागात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रियासी जिल्ह्यात शनिवारी वीज कोसळून एका महिलेसह दोघे जण ठार झाले, तर एक महिला जखमी झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in