
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील हरवान परिसरात, दाचिगाम नॅशनल पार्कजवळ सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
भारतीय लष्कराच्या 'चिनार कॉर्प्स'ने याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर माहिती दिली. "तीन दहशतवाद्यांचा तीव्र चकमकीनंतर खात्मा करण्यात आला आहे. ऑपरेशन सुरूच आहे.", असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती माहिती
गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी हरवानमधील मुल्नार परिसरात अतिरेकीविरोधी कारवाई सुरू केली होती. शोधमोहीमेदरम्यान दोन राऊंड फायरिंग झाल्याचा आवाज ऐकू आला, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. सदर परिसरात तत्काळ अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
पहलगामच्या हल्लेखोरांचा खात्मा?
'ऑपरेशन सिंदूर'बाबत आज लोकसभेत १६ तास महाचर्चा होत असतानाच तीन दहशतवाद्यांच्या खात्म्याचे वृत्त आल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अनेक माध्यमांमध्ये खात्मा झालेले दहशतवादी पहलगाम हल्ल्याशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिघेही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैय्यबा'शी संबंधित असून तिघांचाही पहलगाम हल्ल्यात हात होता आणि त्यापैकी एकजण मास्टरमाइंड होता, असा दावाही केला जात आहे. मात्र तशी कोणतीही अधिकृतरित्या घोषणा अद्याप झालेली नाही. तसेच, मृत दहशतवाद्यांची ओळख देखील अद्याप उघड करण्यात आलेली नाही.