जम्मूः जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये सलग पावसामुळे नद्या तुडुंब भरल्या असून, धरणांतून पाणी सोडल्याने बुधवारी पठाणकोट, गुरदासपूर, तरनतारण, होशियारपूर, कपूरथला, फिरोजपूर आणि फाजिल्का येथे पूरस्थिती निर्माण झाली.
गुरदासपूरच्या दबुरी येथील नवोदय विद्यालयात ४०० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक पूरात अडकले आहेत. शाळेच्या तळमजल्यावर ५ फूट पाणी साचले असून विद्यार्थ्यांना पहिल्या मजल्यावर हलवण्यात आले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शाळा ३० ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वैष्णो देवी यात्रा मार्गावर मृतांची संख्या ३२ वर
जम्मू: जम्मू काश्मीरसह उत्तर भारतात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक जिल्ह्यांमधील स्थिती बिघडली आहे. कटरा येथील वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर बुधवारी दरड कोसळली त्या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत.
कर्तारपूर साहिब गुरुद्वारा पाण्यात बुडाला
दरम्यान, रावी नदीला आलेल्या पुरामुळे करतारपूर साहिब कॉरिडॉरमध्ये ७ फूटपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे पाकिस्तानातील श्री करतारपूर साहिब गुरुद्वाराही पाण्यात बुडाला आहे. करतारपूर कॉरिडॉर हा ४.७किमीचा रस्ता आहे. तो भारतातील डेरा बाबा नानकला थेट पाकिस्तानातील करतारपूर साहिब गुरुद्वाऱ्याशी जोडते. दुसरीकडे, पंजाबच्या पठाणकोटमधील माधोपूर हेडवर्क्स येथे लष्कराने पूरपाण्याने वेढलेल्या जर्जर इमारतीतून २२ सीआरपीएफ जवान आणि ३ नागरिकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने वाचवले.
बचाव मोहिमेसाठी लष्कराचे हेलिकॉप्टर त्या इमारतीच्या छतावर उतरले होते. छतावरून हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर लगेचच इमारतीचा पुढचा भाग पाण्यात गेला. तरीही लष्कराने छतावर अडकलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.
४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले
गुरुदासपूर : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधून येणाऱ्या नद्यांना पूर आल्याने पंजाबच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुदासपूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाला याचा फटका बसला. संपूर्ण कॅम्पस पाण्याखाली गेला आणि तळमजल्यावरील वर्गखोल्या मोठ्या प्रमाणात पाण्याने भरल्या आहेत. हे नवोदय विद्यालय गुरुदासपूरपासून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या डाबुरी गावात आहे. शाळेत ४०० विद्यार्थी आणि सुमारे ४० कर्मचारी अडकले आहेत.