गीतकार जावेद अख्तर यांचा कार्यक्रम लांबणीवर; इस्लामी संघटनांचा विरोध

पश्चिम बंगालमधील इस्लामिक संघटनांनी विरोध केल्यामुळे बॉलिवूडचे नामवंत पटकथा लेखक/गीतकार जावेद अख्तर यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. ममता सरकार इस्लामवाद्यांसमोर झुकल्याचा आरोप आता विरोधकांनी केला आहे.
गीतकार जावेद अख्तर यांचा कार्यक्रम लांबणीवर; इस्लामी संघटनांचा विरोध
Published on

कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील इस्लामिक संघटनांनी विरोध केल्यामुळे बॉलिवूडचे नामवंत पटकथा लेखक/गीतकार जावेद अख्तर यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. ममता सरकार इस्लामवाद्यांसमोर झुकल्याचा आरोप आता विरोधकांनी केला आहे.

राज्य सरकारद्वारे संचलित पश्चिम बंगाल उर्दू अकादमीतर्फे ‘हिंदी सिनेमातील उर्दू’ हा कार्यक्रम ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान कोलकातामध्ये होणार होता. मात्र मुस्लीम संघटना ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने आक्षेप घेतल्यामुळे या सांस्कृतिक कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे.

पश्चिम बंगाल उर्दू अकादमीने अपरिहार्य परिस्थिती उद्भवल्याचे कारण पुढे करत ही घोषणा केली. मात्र जावेद अख्तर यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्यानंतर जमियत उलेमा-ए-हिंदच्या कोलकाता युनिटने यावर आक्षेप घेतला होता.

कोलकाता युनिटचे सरचिटणीस झिलूर रहमान यांनी सांगितले, “जावेद अख्तर यांनी इस्लाम, मुस्लीम आणि अल्लाहविरुद्ध खूप वाईट गोष्टी बोललेल्या आहेत. ही व्यक्ती मानवी वेषातली सैतान आहे. त्यामुळे या कार्यक्रमात जावेद अख्तर यांना बोलावू नका.”

दरम्यान दिवंगत नाटककार सफदर हाश्मी यांच्या भगिनी शबनम हाश्मी यांनी जावेद अख्तर यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात म्हटले की, ही तर सुरुवात आहे. मी याबद्दल आधीच इशारा दिला होता. मुस्लिमांमधील उजव्या विचारसरणीच्या संघटनांना वैध ठरविणे बंद करावे.

logo
marathi.freepressjournal.in