बिहारमध्ये जेडीयू-राजद आघाडीचे सरकार येण्याची शक्यता; नितीशकुमारांनी केली सोनियांशी चर्चा

राज्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेऊन लालू प्रसाद यादवांच्या राजदनेही आपल्या सर्वच आमदारांना पाटण्यात राहण्याची सूचना केली
बिहारमध्ये जेडीयू-राजद आघाडीचे सरकार येण्याची शक्यता; नितीशकुमारांनी केली सोनियांशी चर्चा

बिहारमधील सत्ताधारी भाजप-जेडीयू आघाडी पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या सर्वच खासदार व आमदारांना पुढील दोन दिवसांत राजधानी पाटण्याला पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आघाडी मोडीत निघून राज्यात ११ ऑगस्टपर्यंत जेडीयू-राजद आघाडीचे सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यास राजद, काँग्रेस व डाव्या पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेऊन लालू प्रसाद यादवांच्या राजदनेही आपल्या सर्वच आमदारांना पाटण्यात राहण्याची सूचना केली आहे. विशेषतः राजद नेते तेजस्वी यादवही मंगळवारी आपल्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश यांनी सोनिया गांधींशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे गुरुवारपर्यंत बिहारला नवे आघाडी सरकार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नितीशकुमारांना सरकार चालवताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिराग प्रकरणानंतर आरसीपी प्रकरणामुळेही ते भाजपवर नाराज आहेत. गत काही महिन्यांत नितीश यांनी भाजपशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बैठकांपासून अंतर राखले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी बोलावलेल्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेबाबत बोलताना काही दिवसांत प्रादेशिक पक्ष संपलेले असतील, असे वक्तव्य केल्यानेही नितीशकुमार हे अस्वस्थ झाल्याचे समजते. नितीशकुमार यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ देण्यात आलेल्या स्नेहभोजनाला व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या शपथविधी सोहळ्यालाही दांडी मारली होती. नितीश बिहारमधील भाजप नेत्यांनाही भेटी नाकारत आहेत.

ते स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांना हजर राहत आहेत; पण भाजप नेत्यांशी मुक्त संवाद साधण्यास ते टाळत आहेत.

नितीशकुमार सात वेळा बनले मुख्यमंत्री

२०२०च्या विधानसभा निवडणुकीत नितीश यांच्या जेडीयूला अवघ्या ४३ जागा मिळाल्या. याउलट भाजपच्या जागा ७४ वर पोहोचल्या होत्या. त्यानंतरही भाजपने नितीश यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली. या निवडणुकीत एनडीएला १२५, तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या होत्या. नितीशकुमार हे गेल्या २२ वर्षांत बिहारमध्ये सात वेळा मुख्यमंत्री झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in