

पाटणा : 'समान नागरिक संहिता' विधेयकातील तरतुदी जर आक्षेपार्ह नसतील, तर त्यांची आपला पक्ष या विधेयकाला विनाकारण विरोध करणार नाही, असे बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जदयूचे नेते विजयकुमार चौधरी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी "२०२९ पर्यंत सर्व एनडीएशासित २२ राज्यांमध्ये यूसीसी लागू केला जाईल" असे विधान केल्यापासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर जद(यु) पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी विधानसभा अध्यक्ष विजय चौधरी यांनी पक्षाची भूमिका मांडली.
मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) "हा कायदा मुस्लिमांच्या हिताच्या विरोधात आहे" असा आरोप करत बिहारमध्ये यूसीसी लागू होऊ न देण्याचा इशारा दिला आहे. आरजेडीच्या या भूमिकेपासून अंतर राखत चौधरी म्हणाले, आम्ही आरजेडीच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो हा भ्रम मनातून काढून टाका. आम्ही बिहारमधील सत्ताधारी एनडीएचा भाग आहोत आणि आघाडीच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेऊ.