पत्नीने शेजाऱ्याकडून गुटखा मागितला, राग आल्याने पतीने स्वत:चा गळा कापला; मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

शिवरामला याबाबत विचारले असता त्याने स्वत:च स्वत:वर वार केला की त्याच्यावर अन्य कोणी वार केला, हे माहीत नसल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी तो पूर्णपणे शुद्धीवर आला नव्हता.
पत्नीने शेजाऱ्याकडून गुटखा मागितला, राग आल्याने पतीने स्वत:चा गळा कापला; मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने शेजाऱ्याकडून गुटखा उसनवार घेतल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने स्वत:चा गळा आणि मनगट कापल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बैतूलमधील गऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवराम राठोड (35) हा पत्नी पूजासोबत राहत होता. तो मुळ झाल्लार येथील रहिवासी होता. मात्र, मागील तीन वर्षांपासून तो बैतूल येथे मोलमजुरी करत होता. रविवारी शिवरामची पत्नी पूजाने शेजाऱ्याकडून उसनवार गुटखा घेऊन खाल्ला, याचा त्याला प्रचंड राग आला. तो आपल्या पत्नीसोबत भांडू लागला. त्याला विचारण्याऐवजी तिने दुसऱ्या पुरुषाकडून गुटखा का घेतला? असा जाब त्याने पत्नीला विचारला. यावेळी दोघांमधील वाद विकोपाला गेला, त्यानंतर त्याने ब्लेडच्या सहाय्याने स्वत:चा गळा आणि मनगट कापून घेतले. यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहचून त्याला रुग्णालयात दाखल करत त्याचा जीव वाचवला.

शिवराच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, दोघांनी प्रेमविवाह केला होता. नेहमी त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते. तिने शेजाऱ्याकडून गुटखा उसनवार घेऊन खाल्याने शिवरामला राग आला. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, त्यानंतर तो बाहेर गेला आणि दारू पिऊन घरी परतला. यानंतर त्याने पुन्हा भांडायला सुरुवात केली. भांडण वाढत गेल्याने तिने तिच्या भावाला फोन करुन सांगितले. तिच्या भावाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

पोलिसांना कळवण्यात आल्याचे समजताच शिवराम अधिकच संतापला आणि पोलीस येण्याच्या 15 मिनिटे आधी त्याने स्वतःवर ब्लेडने वार केले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना तो गंभीर अवस्थेत आढळून आला. रात्री 12 वाजेच्या सुमारास त्याला उपरासाठी तातडीने बैतूल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शिवरामला याबाबत विचारले असता त्याने स्वत:च स्वत:वर वार केला की त्याच्यावर अन्य कोणी वार केला, हे माहीत नसल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी तो पूर्णपणे शुद्धीवर आला नव्हता. दरम्यान, आज सकाळपासून शिवराम रुग्णालयात नसून तो पळून गेल्याची माहिती, रुग्णालय पोलीस चौकीकडून देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in