
नवी दिल्ली : आयआयटी, कानपूरने आयआयटीमध्ये प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘जेईई ॲॅडव्हान्स’ परीक्षेच्या निकालासह टॉपर विद्यार्थ्यांची यादी सोमवारी जाहीर केली. या परीक्षेत मुलांमधून रजित गुप्ता, तर मुलींमधून देवदत्त माझी प्रथम आले आहेत. ‘जेईई’च्या निकालामध्ये पहिल्या १० जणांमध्ये पार्थ वर्तक आणि साहिल देव या मुंबईतील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
‘जेईई ॲडव्हान्स २०२५’चा निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाला. या परीक्षेत आयआयटी दिल्ली झोनमधून परीक्षा दिलेला राजित गुप्ता हा ३६० पैकी ३३२ गुण मिळवून कॉमन रँक लिस्टमध्ये (सीआरएल) अव्वल आला. त्याचवेळी आयआयटी दिल्ली झोनमधील सक्षम जिंदाल हा ३३२ गुण मिळवून ‘सीआरएल’मध्ये दुसरा, तर आयआयटी खरगपूर झोनमधून परीक्षा दिलेली देवदत्त माझी ही ३६० पैकी ३१२ गुण मिळवून महिलांमध्ये अव्वल आली आहे. मात्र, कॉमन रँक लिस्टमध्ये ती १६ व्या क्रमांकावर आहे. राजित गुप्ता याचे वडील बीएसएनएलमध्ये अभियंता व आई प्राध्यापक आहे. राजितच्या वडिलांनी १९९४ मध्ये राजस्थान प्री-अभियांत्रिकी परीक्षेत ४८ वा क्रमांक पटकावला होता.
यंदा कटऑफ ३ टक्के कमी
यंदा ‘जेईई ॲॅडव्हान्स’मध्ये कटऑफ ३ टक्के कमी झाला आहे. संपूर्ण ‘जेईई ॲॅडव्हान्स’मधील कटऑफ १०९ वरून ७६ झाली. जो गेल्या वर्षीपेक्षा ३० टक्के कमी आहे.
‘सीआरएल’मध्ये आयआयटी मुंबई झोनमधून परीक्षा दिलेला माजिद हुसेनने ३३० गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे या परीक्षेमध्ये पहिल्या १० जणांमध्ये मुंबईतून पार्थ वर्तक व साहिल देव यांनी स्थान मिळवले आहे. पार्थ वर्तक याने ३६० पैकी ३२७ गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला आहे, तर साहिल देव याने ३६० पैकी ३२१ गुण मिळवून सातवा क्रमांक पटकावला आहे. या दोघांनीही आयआयटी मुंबई झोनमधून परीक्षा दिली होती.