
मुंबई : देशातील आयआयटीमधील प्रवेशासाठी बंधनकारक असलेली संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मुख्य परीक्षा जानेवारी व एप्रिलमध्ये २०२५ मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेची अर्ज नोंदणी प्रक्रिया ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) केली आहे. परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी संयुक्त प्रवेश परीक्षा-२०२६ संदर्भातील अधिक माहिती आणि सूचनांसाठी नियमितपणे एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ www.nta.ac.in आणि https://jeemain.nta.nic.in/ला भेट देण्याची सूचना एनटीएने केली आहे.
ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना अडथळे येऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत असे आवाहन एनटीएने केले आहे. अर्ज करण्यापूर्वी आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख (दहावीच्या प्रमाणपत्रानुसार), नवीन छायाचित्र, पत्ता आणि वडिलांचे नाव अद्ययावत करून ठेवावे. त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या यूडीआयडी कार्डची वैधता तपासून घ्यावी. आवश्यकतेनुसार त्याचे अद्ययावतीकरण किंवा नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
ईडब्ल्यूएस / एससी/एसटी/ओबीसी-एनसीएल या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे श्रेणी प्रमाणपत्र अद्ययावत व वैध असणे आवश्यक असल्याने त्यांनी ते अद्ययावत करून घ्यावे, अशा सूचना एनटीएकडून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नसल्याचे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संयुक्त प्रवेश परीक्षा दोन सत्रात होणार
एनटीएने संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य)-२०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा दोन सत्रात होणार असून पहिले सत्र जानेवारी २०२६ मध्ये तर दुसरे सत्र एप्रिलमध्ये होणार आहे. अद्याप परीक्षेची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे नोंदणी कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) २०२६ सत्र १ साठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होणार असल्याचे संकेत एनटीएकडून देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक लिंक https://jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.