गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हेमंत सोरेन यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईमुळे त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आज चंपाई सोरेन सरकारची बहुमत चाचणी पार पडली. ही चाचणी चंपाई सोरेन यांनी जिंकली आहे. त्यामुळे चंपाई सोरेन हेच आता मुख्यमंत्री राहणार आहेत. आज पार पडलेल्या बहुमत चाचणीत सोरेन यांच्या सरकारच्या बाजूने ४७ तर विरोधात २९ मते पडली.
दहा दिवसांचा दिला होता वेळ-
चंपाई सोरेन यांनी २ फेब्रुवारी रोजी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन यांना अटक करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी चंपाई सोरेन यांना दहा दिवसांचा वेळ दिला होता. अखेर आज झालेली बहुमत चाचणी चंपाई सोरेन यांनी बहुमताने जिंकली.
आमदारांना हैदराबादमध्ये हलवले होते-
या बहुमत चाचणीवेळी आमदार फुटण्याचा धोका होता. हा धोका लक्षात घेऊन सोरेन सरकारमधील आमदारांना हैदराबादमध्ये हालवण्यात आले होते. आज बहुमत चाचणी असल्याने काल(४ फेब्रुवारी) संध्याकाळी सर्व आमदार रांची येथे परतले होते.
झारखंडमध्ये कोणत्या पक्षाकडे किती आमदार?
झारखंड विधानसभेत एकूण ८१ सदस्य आहेत. यात बहुमतासाठी ४१ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. झामुमोच्या नेतृत्वाखालील युतीकडे ४८ आमदाराचे बहुमत आहे. यात झामुमोचे २९, काँग्रेसचे १७, आरजेडी आणि सीपीआय(ML) यांच्या प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश आहे. एनडीएकडे २९ आमदार असून यातील एकट्या भाजपाकडे भाजपकडे २६, AJSU कडे ३, तर उर्वरित ३ आमदार अपक्ष आणि इतरांचे आहेत.