हेमंत सोरेन 'बेपत्ता': झारखंडच्या सर्व सत्ताधारी आमदारांना महत्त्वाच्या बैठकीसाठी रांचीमध्येच राहण्याच्या सूचना

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची दिल्लीतील बीएमडब्ल्यू कार ईडीने जप्त केली आहे. तर, ज्या चार्टर्ड विमानाने सोरेन यांनी रांची ते दिल्ली प्रवास केला ते दिल्ली विमानतळावर उभे आहे.
हेमंत सोरेन 'बेपत्ता': झारखंडच्या सर्व सत्ताधारी  आमदारांना महत्त्वाच्या बैठकीसाठी रांचीमध्येच राहण्याच्या सूचना

दिल्ली आणि झारखंडची राजधानी रांचीमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करायची आहे. मात्र ते 24 तासांपासून "बेपत्ता" असल्याचा अधिकृत सूत्रांचा दावा आहे. तर, झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित आणि त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. अशात, झारखंडमधील सत्ताधारी आघाडीच्या सर्व आमदारांना राज्याची राजधानी रांचीमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.

सीएम हाऊसमध्ये होणाऱ्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थिती आणि बुधवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या योजनेबाबत रणनीती आखण्याचा उद्देश आहे. ईडीच्या ईमेलला उत्तर देताना, सोरेन यांनी 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता त्यांच्या निवासस्थानी निवेदन देण्याचे मान्य केले आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते विनोद कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे सत्ताधारी आघाडीच्या सर्व आमदारांना रांचीमध्ये राहण्याची विनंती करण्यात आली आहे. सत्ताधारी आघाडीत झामुमो, काँग्रेस आणि RJD यांचा समावेश आहे. पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठक बोलावणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री रांचीला परतले आहेत का असे विचारले असता त्यांनी अनिश्चितता व्यक्त केली.

ईडीच्या टीमने दिल्लीतील सोरेन यांच्या निवासस्थानी भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशिरापर्यंत सत्ताधारी पक्षाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी थांबले होते.

बीएमडब्ल्यूसह ३६ लाख जप्त

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सोरेन यांच्या ठावठिकाणाविषयी कोणतीही माहिती नाही. ज्या चार्टर्ड विमानाने त्यांनी रांची ते दिल्ली प्रवास केला ते दिल्ली विमानतळावर उभे आहे. त्यांच्यासोबतच्या अनेकांचे फोन बंद आहेत. त्यांची दिल्लीतील बीएमडब्ल्यू कार ईडीने जप्त केली आहे. त्यांच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली आहे, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. काही कागदपत्रे आणि ३६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील त्याच्या घरांना आणि झारखंड भवनला भेट दिली, पण ते सापडले नाहीत. सोरेन यांनी रविवारी रात्री उशिरा दिल्लीतील निवासस्थान सोडले, असे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजपने जाहीर केले बक्षीस -

दुसरीकडे सोरेन यांच्यावर भाजपने बक्षीसही जाहीर केलं आहे. सोरेन यांना शोधून द्या, 11 हजार रुपये घेऊन जा, अशी घोषणा झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून केली आहे.

काय आहे प्रकरण -

कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सोरेन यांची चौकशी होणार आहे. झारखंडमधील माफियांकडून जमिनीची मालकी बेकायदेशीरपणे बदलण्याच्या कथित रॅकेटशी संबंधित हे प्रकरण आहे. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in