
रांची/हजारीबाग : झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक कोटी रुपयांचे इनाम जाहीर असलेल्या नक्षलवाद्यासह तीन नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
या चकमकीत दोन सुरक्षा जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गोरहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांटिट्री जंगलात सकाळी साडेसहाच्या सुमारास सीपीआय (माओवादी) संघटनेच्या साहदेव सोरेन या नक्षली नेत्याशी सुरक्षा दलांची चकमक झाली.
साहदेव सोरेन उर्फ प्रवेश याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. त्याचा आणि इतर दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह शोध मोहिमेदरम्यान आढळल्याचे झारखंड पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळावरून तीन एके-४७ रायफल्स आणि ६३ काडतुसे जप्त करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. साहदेववर ३० गुन्हे, रघुनाथवर ५८ आणि बिरसेनवर ३६ गुन्हे दाखल होते.