

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पाठबळावर कार्यरत असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्स या डिजिटल सेवा कंपनीने बुधवारी शेअर बाजारात दमदार पदार्पण केले. कंपनीचा समभाग आयपीओच्या १,११९ रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत जवळपास २७ टक्क्यांनी वधारून बंद झाला.
मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) जिओचा समभाग १,३५८ रुपयांवर व्यवहारासाठी खुला झाला. इश्यू किमतीच्या तुलनेत त्यात २१.३६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
बीएसईवर जिओचा समभाग २६.६६ टक्क्यांनी वधारून १,४१७.३५ रुपयांवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात त्याने २७.२३ टक्क्यांची वाढ नोंदवत १,४२३.८० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. एनएसईवर समभाग २६.६७ टक्क्यांनी वाढून १,४१७.५० रुपयांवर बंद झाला. दिवसभरात त्याने २७.२४ टक्क्यांची झेप घेत १,४२३.९० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.
बाजारमूल्यानुसार देशातील पहिल्या पाच कंपन्यांच्या क्रमवारीत जिओ प्लॅटफॉर्म्सने भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांना मागे टाकले. रिलायन्स इंडस्ट्रीज १५.६७ लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह देशातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी म्हणून कायम आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य २८.७२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
दमदार पदार्पणानंतर जिओ प्लॅटफॉर्म्स ही देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली दूरसंचार कंपनीही ठरली. तिने १२.१६ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या भारती एअरटेलला मागे टाकले.
रिलायन्सच्या पहिल्या आयपीओच्या आठवणींना उजाळा
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बिगर-कार्यकारी संचालक आणि जिओ प्लॅटफॉर्म्सच्या संचालक ईशा अंबानी यांनी या समभाग नोंदणीचा संबंध सामान्य भारतीयांना देशाच्या आर्थिक विकासात सहभागी करून घेण्याच्या कुटुंबाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी जोडला. १९७७ मध्ये रिलायन्सच्या पहिल्या सार्वजनिक समभाग विक्रीत वडील मुकेश अंबानी सहभागी झाले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. त्या वेळी कंपनीने १० कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर २.८२ कोटी रुपये उभारले होते.
'जिओ तुम्ही उभारले'; अंबानींचे भारतीयांना आवाहन
जिओ प्लॅटफॉर्म्सचे संचालक अनंत अंबानी यांनी समभाग नोंदणीला सार्वजनिक विश्वास आणि राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचा भाग म्हणून संबोधले. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि सामान्य भारतीयांच्या आकांक्षांचा उल्लेखही त्यांनी केला. "आज जिओ भारताचा झाला आहे," असे ते म्हणाले. भारतातील लोकांनीच जिओ उभारली असून या कंपनीने वर्गखोल्या, कुटुंबे, रुग्ण आणि समुदाय यांना जोडून त्यांच्या जीवनात बदल घडवला आहे, असे ते म्हणाले. "जिओ आपने बनाया" अर्थात, "जिओ तुम्ही उभारली," असे अनंत म्हणाले.
१३ लाख कोटींसह बनली देशातील दुसरी मौल्यवान कंपनी
जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने बुधवारी शेअर बाजारात दमदार पदार्पण केल्यानंतर बाजारमूल्याच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मूल्यवान कंपनी होण्याचा मान मिळवला. तेजीमुळे बीएसईवर जिओ प्लॅटफॉर्म्सचे बाजारमूल्य १३ लाख पाच हजार २४१.९८ कोटी रुपयांवर पोहोचले. देशातील बाजारमूल्याच्या क्रमवारीत जिओच्या पुढे केवळ रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य १५ लाख ६७ हजार ७४४.६१ कोटी रुपये आहे.
टाॅप ५ कंपन्या
रिलायन्स इंडस्ट्रीज : १५.६७ लाख कोटी रुपये
जिओ प्लॅटफॉर्म्स : १३.०५ लाख कोटी रुपये
भारती एअरटेल : १२.१६ लाख कोटी रुपये
एचडीएफसी बँक : १०.५८ लाख कोटी रुपये
आयसीआयसीआय बँक : ९.८६ लाख कोटी रुपये
(जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या दोन्ही कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य २८.७२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.)