जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर; राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून मतदारसंघात हिंदुत्वाचा जागर

श्रीराम हे प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात या झेंड्यांच्या माध्यमातून पोचवण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे
जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर; राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून मतदारसंघात हिंदुत्वाचा जागर

ठाणे : श्रीरामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून घरचा आहेर देण्यात आला आहे. कळव्यात सुमारे १० हजार भगव्या झेंड्यांचे वाटप करून राम घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहचवण्याचे काम राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. संपूर्ण कळव्यात हे दहा हजार झेंडे लावण्यात आल्याने आव्हाडांचा हा मतदार संघ भगवामय झाला आहे. श्रीराम प्रभू हे प्रत्येक हिंदूंचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

'श्रीराम हे मांसाहारी होते' असे वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी राज्याच्या सत्तेत असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेकडून (शिंदे गट) जय्यत तयारी सुरू आहे. ठाण्यातही दोन्ही पक्षांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दोन्ही पक्षाने आपापली ताकद दाखवण्याचा देखील प्रयत्न करत असले, तरी आता यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मंदार केणी यांनी कळव्यात १० हजार झेंड्याचे वाटप केले आहे. हे झेंडे संपूर्ण कळवा परिसरात लावण्यात आल्याने संपूर्ण कळवा परिसर भगवामय झाला आहे.

१० हजार झेंड्यांचे वाटप

श्रीराम हे प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात या झेंड्यांच्या माध्यमातून पोचवण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या मंदिरात श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार आहे. तर कोणी धार्मिक कार्यक्रम करणार आहे. याशिवाय, कोणी नागरिकांच्या मनामनात असलेला श्रीराम ओळखून तो त्यांच्या घराघरात कसा जयश्री राम दिसेल यासाठी झेंड्याचे वाटप करत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मंदार केणी यांनी कळव्यात १० हजार झेंड्यांचे वाटप केले आहे. हे भगवे झेंडे नागरिकांनी घराबाहेर किंवा बिल्डिंगवर लावले आहेत. हिंदुत्व हा विशिष्ट पक्षाचा विचार नसून, हा सर्वांचा विचार असल्याचे सांगत अशा प्रकारच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादीने हिंदुत्वाचा जागर केला आहे.

प्रभु श्रीराम हे आमच्याही मनामनात आहेत. प्रभु श्रीराम हे प्रत्येक हिंदूंचा अभिमान असून, ते प्रत्येकाच्या मनामनात आहेत. त्यामुळेच आम्ही झेंड्यांमार्फत राम घराघरापर्यंत पोहचविण्याचा छोटा प्रयत्न केला आहे. कळवा परिसरात आठ हजार भगवे झेंडे लावलेले असून हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नाहीत. या झेंड्यांवर राम आणि मंदिराचे चित्र आहे. ‘मन और घर मे जय श्रीराम’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला आहे. - मंदार केणी, माजी युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

logo
marathi.freepressjournal.in