जम्मू-काश्मीरमध्ये आज अखेरच्या टप्प्यातील मतदान; ४० जागांसाठी ४१५ उमेदवार रिंगणात

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान मंगळवारी होत असून त्यासाठी सात जिल्ह्यांमध्ये २० हजारांहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये आज अखेरच्या टप्प्यातील मतदान; ४० जागांसाठी ४१५ उमेदवार रिंगणात
एएनआय
Published on

जम्मू : जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान मंगळवारी होत असून त्यासाठी सात जिल्ह्यांमध्ये २० हजारांहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अखेरच्या टप्प्यात एकूण ४१५ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये तारा चंद आणि मुझफ्फर बेग या दोघा माजी उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

‘कलम ३७०’ रद्द करण्यात आल्यानंतर आता पश्चिम पाकिस्तान निर्वासित, वाल्मिकी समाज आणि गोरखा समाजाला मतदानाचा अधिकार मिळणार आहे. यापूर्वी त्यांना केवळ पंचायत आणि शहरी स्थानिक संस्थांमध्ये मतदानाचा अधिकार मिळाला होता.

४० जागांसाठी मतदान

मंगळवारी होणाऱ्या अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी ५,०६० मतदान केंद्रे उभारण्यात आली असून जम्मू प्रदेशातील जम्मू, उधमपूर, सांबा आणि कथुआ, तर उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, बंदिपोरा आणि कुपवाडामधील ४० जागांसाठी मतदान होणार आहे.

मतदान शांततेत आणि दहशतवादमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ६१.३८ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात ५७.३१ टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली होती. ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in