
जम्मू : जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रणरेषेजवळ (एलओसी) एका लष्करी गस्ती पथकावर संशयित दहशतवाद्यांनी शनिवारी गोळीबार केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना राजौरीच्या केरी सेक्टरमध्ये घडली.
शनिवारी दुपारी २ वाजता राजौरीच्या केरी सेक्टरमधील बाराटगला भागात लष्कराच्या गस्ती पथकावर संशयित दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. हा गोळीबार नियंत्रणरेषेच्या पुढच्या भागात दुपारी घडला आणि तो सीमेपलीकडून आलेल्या संशयित दहशतवाद्यांनी केला असल्याचा संशय आहे. लष्करी जवानांनी प्रत्युत्तरादाखल काही फायर केले. सध्या या भागात शोधमोहीम सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
शुक्रवारी पूंछ जिल्ह्यातील बट्टल सेक्टरमध्ये नियंत्रणरेषेजवळ झालेल्या भूसुरुंग (लँडमाइन) स्फोटात पाच पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यापैकी एकाने चुकून सीमेवर लावलेल्या भूसुरुंगावर पाय ठेवल्यामुळे स्फोट झाला. या स्फोटात पाचही दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.
जम्मू-कश्मीरच्या सीमेलगतच्या भागांमध्ये घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने मोठ्या प्रमाणात भूसुरुंग पेरले आहेत. हा भाग 'नो मॅन्स लँड' म्हणून ओळखला जातो आणि येथे गस्त घालणाऱ्या सैनिकांसह स्थानिक रहिवाशांनाही प्रवेश बंदी आहे. यंदा हिवाळ्यात डोंगरांवर फारसा बर्फ न पडल्याने दहशतवाद्यांसाठी सर्व घुसखोरी मार्ग खुले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लष्कर आणि सुरक्षा दलांनी सीमावर्ती भागात आणि अंतर्गत भागात सतर्कता वाढवली आहे.
या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये शून्य घुसखोरी आणि दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे निर्देश दिले आहेत.