JNU मध्ये पुन्हा हिंसाचार! मध्यरात्री डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांत धुमश्चक्री; हाणामारी, दगडफेक, धावपळीत अनेकजण जखमी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने (जेएनयूएसयू) रात्री ९ च्या सुमारास कॅम्पसमधील साबरमती टी पॉइंट येथून ईस्ट गेटपर्यंत "समता जुलूस"चे आयोजन केले होते. कुलगुरूंनी अलीकडील पॉडकास्ट मुलाखतीत केलेल्या वक्तव्याविरोधात आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या (JNUSU) निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. पण...
JNU मध्ये पुन्हा हिंसाचार! मध्यरात्री डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांत धुमश्चक्री; हाणामारी, दगडफेक,  धावपळीत अनेकजण जखमी
Published on

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी रात्री डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. रात्री सुमारे १.३० वाजता दोन्ही गटांमध्ये हाणामारी, दगडफेक आणि धावपळ झाल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप करत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले आहेत.

सुरूवात कशी झाली?

हिसाचाराचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी प्राथमिक माहितीनुसार, जेएनयूच्या कुलगुरू संतिश्री धुलीपुडी पंडित यांनी केलेल्या कथित जातीवादी वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि काही विद्यार्थी नेत्यांवर केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने (जेएनयूएसयू) रात्री ९ च्या सुमारास कॅम्पसमधील साबरमती टी पॉइंट येथून ईस्ट गेटपर्यंत "समता जुलूस"चे आयोजन केले होते. कुलगुरूंनी अलीकडील पॉडकास्ट मुलाखतीत केलेल्या वक्तव्याविरोधात आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या (JNUSU) निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. पण, रात्री १.३० च्या सुमारास परिस्थिती चिघळली.

दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप

डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा आरोप आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कार्यकर्त्यांनी मोर्चाचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तणाव वाढून हाणामारीत रूपांतर झाले.

“जातीय वक्तव्य करणाऱ्या कुलगुरू आणि विद्यार्थी नेत्यांवरील कारवाईविरोधात आवाज उठवताच अभाविपने दगडफेक सुरू केली,” असा आरोप डाव्या गटांनी केला आहे.

दुसरीकडे, अभाविपने हे आरोप फेटाळले आहेत. “डाव्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या आणि काठ्यांनी महिला विद्यार्थिनींवर हल्ला केला. कॅम्पस सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला नाही,” असा आरोप अभाविपने केला आहे.

ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA)सह डाव्या समर्थित गटांनी दावा केला की अभाविप कार्यकर्त्यांनी प्रथम दगडफेक केली आणि “निःशस्त्र विद्यार्थ्यांवर” हल्ला केला, ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले.

तर अभाविपचे मीडिया समन्वयक विजय जयस्वाल यांनी आरोप केला की ३०० ते ४०० मुखवटा घातलेले डाव्या गटातील सदस्य कॅम्पसमध्ये घुसले आणि शैक्षणिक इमारती, ग्रंथालय व अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला. काही विद्यार्थ्यांना स्वतःला त्यांच्या खोल्या आणि बाथरूममध्ये कोंडून घ्यावे लागले, असा दावा त्यांनी केला. हा प्रकार नियोजित हिंसाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

डाव्या संघटनांचा मात्र दावा आहे की त्यांनी शांततेत मोर्चा काढला होता, पण अभाविपच्या विद्यार्थ्यांनी जाणूनबुजून तणाव वाढवला आणि दगडफेक करून गोंधळ निर्माण केला.

पोलिस पोहोचल्यावर परिस्थिती नियंत्रणात

हिंसाचाराची माहिती मिळताच पोलिसांनी कॅम्पसमध्ये पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या हाणामारीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले आणि काहींना तेथेच प्राथमिक उपचार देण्यात आले. विद्यापीठ प्रशासनाने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in