मोदी-शहांविरोधात घोषणाबाजी महागात! 'त्या' विद्यार्थ्यांचे तात्काळ निलंबन होणार; JNU चा इशारा; एफआयआरही दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाच्या कठोर कारवाईचा इशारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (JNU) दिला आहे. 'विद्यापीठे द्वेषाची प्रयोगशाळा बनू शकत नाहीत', असे नमूद करत या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
मोदी-शहांविरोधात घोषणाबाजी महागात! 'त्या' विद्यार्थ्यांचे तात्काळ निलंबन होणार; JNU चा इशारा; एफआयआरही दाखल
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाच्या कठोर कारवाईचा इशारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (JNU) दिला आहे. 'विद्यापीठे द्वेषाची प्रयोगशाळा बनू शकत नाहीत', असे नमूद करत या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार, पण...

"माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी आधीच पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. विद्यापीठे ही नव्या विचारांची, संशोधनाची आणि नवकल्पनांची केंद्रे असतात. ते द्वेषाची प्रयोगशाळा बनू शकत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. मात्र, हिंसाचार, बेकायदेशीर वर्तन किंवा राष्ट्रविरोधी कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही."

तात्काळ निलंबन, निष्कासन, विद्यापीठातून कायमस्वरूपी बडतर्फी

"या घटनेत सामील असलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ निलंबन, निष्कासन आणि विद्यापीठातून कायमस्वरूपी बडतर्फी यांसारख्या शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल." असेही JNU प्रशासनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.

वसंत कुंज पोलिसांत एफआयआर दाखल

दिल्लीतील वसंत कुंज पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विद्यापीठाने म्हटले आहे की, या घोषणा 'द्वेषयुक्त' (हेट स्पीच) असून त्यांनी जेएनयूच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. विद्यापीठाने या कृत्याला 'भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचा थेट अवमान' म्हटले असून, भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

सोमवारी रात्री JNU कॅम्पसमधील साबरमती वसतिगृहाबाहेर झालेल्या आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती. या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०२० च्या दिल्ली दंगलीतील कट प्रकरणात माजी JNU विद्यार्थी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन देण्यास नकार दिल्यानंतर काही तासांतच हे आंदोलन झाले होते. ५ जानेवारी २०२० रोजी झालेल्या कॅम्पसमधील हिंसाचाराला सहा वर्षे झाल्यानिमित्त आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने (जेएनयूएसयू) याचे आयोजन केले होते.

logo
marathi.freepressjournal.in