

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी सांगितले की, भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या द्विपक्षीय व्यापार करारावरील संयुक्त निवेदन पुढील ४-५ दिवसांत अंतिम होऊन स्वाक्षरी केले जाऊ शकते. हा कराराचा पहिला टप्पा आहे आणि त्याचा कायदेशीर मसुदा मार्चच्या मध्यापर्यंत तयार होईल. गोयल यांनी संसदेत आणि माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
गोयल म्हणाले की, दोन्ही देशांदरम्यान चर्चा वेगाने सुरू आहे. संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी झाल्यानंतर अमेरिका भारतीय वस्तूंवरील शुल्क कमी करून १८ टक्के करेल. यावर व्हर्च्युअल पद्धतीनेही स्वाक्षरी केली जाऊ शकते. भारत आणि अमेरिका पूरक अर्थव्यवस्था आहेत, हा करार दोघांसाठी फायदेशीर ठरेल.
कृषी-दुग्धव्यवसाय क्षेत्र सुरक्षित
कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राला या करारामध्ये पूर्णपणे संरक्षण देण्यात आले आहे. ‘फ्रेमवर्क अंडरस्टँडिंग’मध्ये दोन्ही देशांचे गंभीर आणि संवेदनशील क्षेत्र सुरक्षित राहतील. १४० कोटी भारतीयांची ऊर्जा सुरक्षा ही सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. या करारामध्ये कोणतीही गुंतवणुकीची वचनबद्धता नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.