

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर नीट पेपर फुटी प्रकरणावरून राजकारण केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, फक्त आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संसदेत सखोल चर्चेला विरोधकांनी परवानगी द्यावी, असे आवाहन नड्डा यांनी केले.
पेपर लीकच्या मुद्द्यावर संसदेच्या पटलावर सखोल चर्चा करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी आंदोलनाचा राहुल गांधी हे राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप त्यांनी केला. तुमचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचे हित नसून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून राजकीय फायदा उठवणे आणि राजकारण करणे हाच आहे, हे स्पष्ट होते. हे अत्यंत दुर्दैवी आहे," असे नड्डा म्हणाले.